S M L

परभणीत व्यापार्‍याच्या आत्महत्येमुळे पोलीस-गावकर्‍यांमध्ये धुमश्चक्री

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 04:55 PM IST

परभणीत व्यापार्‍याच्या आत्महत्येमुळे पोलीस-गावकर्‍यांमध्ये धुमश्चक्री

10 जुलै : परभणीतल्या पोलिसांना गावकर्‍यांच्या प्रचंड संतापाला सामोरं जावं लागलं. लाचखोर पोलिसांच्या जाचाला कंटाळून गुटखा व्यापार्‍याने आत्महत्या केल्यामुळे संतप्त जमावाने संबंधित पोलिसाच्या घराची आणि पोलीस ठाण्याची तोडफोड केलीये. गावकर्‍यांनी पोलीस ठाण्यावरच हल्लाबोल करून वाहनं पेटवून दिली. सध्या सोनपेठ गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सोनेपेठ गावातल्या गुटखा विक्री प्रकरणात मुरलीधर आणि विठ्ठल हाके यांना पोलिसांनी अटक केली होती. विठ्ठलला रात्री ताब्यात घेताना पोलिसांनी त्याच्या डोक्यावर गुटखा ठेवून, मारहाण करत गावात नेलं. यातून सुटका करायची असेल तर चाळीस हजारांची मागणी केली. विठ्ठलनं तीस हजार दिले पण दहा हजार दिले नाहीत म्हणून पोलीस पुन्हा त्याच्या घरी गेले. पण, तोपर्यंत विठ्ठल हाकेनं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ही बातमी पसरल्यावर पोलिसांच्या हफ्तेखोरीला कंटाळलेल्या सगळ्याच व्यापार्‍यांनी बाजारपेठ बंद केली. पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. वाहनंही जाळली. संबंधित पोलिसाच्या घराचं,वाहनांचंही नुकसान केलं. अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार करुन जमावाला पांगवलं. ही धुमश्चक्री तब्बल 5 तास चालली सोनपेठमध्ये येताना पोलीस अधीक्षक नियती ठाकूर यांच्या गाडीवरही तुफान दगडफेक करण्यात आलीये.

त्यांना खाजगी गाडीत सोनपेठ ला नेण्यात आले तरीही त्या मात्र आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगून चौकशी करू एवढे म्हणून मोकळे होत आहे .दरम्यान, सोनपेठ मध्ये सध्या तणाव पूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त शहरभर तैनात करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close