S M L

सेनेत स्वाभिमान असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं, पवारांचं टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 05:53 PM IST

PAWAR X UDDHAV10 जुलै : भाजपचे अध्यक्ष अमित शहा जाहीरपणे म्हणताय सत्तेत सोबत राहण्यास खंत वाटते. आता जर शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंमध्ये खरंच स्वाभिमान उरला असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये. तसंच जर खरंच उद्धव ठाकरेंचा स्वाभिमान जागा झाला आणि ते बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुका होऊ शकते असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत महासंपर्क अभियनात महाराष्ट्रात पाठिंबा घेऊन सत्ता आली याबद्दल खंत व्यक्त केली होती. एकाप्रकारे शिवसेनेबद्दल अमित शहांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. आज शिवसेनेनं शहांना प्रत्युत्तर दिलं. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड प्रमाणे त्यांना आत्मविश्वास असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं, असा खोचक सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला.

मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अमित शहांच्या टीकेवरून शिवसेनाचा खरपूस समाचार घेतला. अमित शहा जाहीरपणे म्हणताय की, सत्तेत सोबत राहण्यास खंत वाटते. साहजिकच हे शिवसेनेबद्दल म्हटलंय. पण, मुळात ज्यांच्यामुळे अमित शहांना खंत वाटते त्यांच्यात काही स्वाभिमान आहे की नाही. जर काही स्वाभिमान असेल तर ते सत्तेत राहणार नाही. कारण, स्वाभिमानी माणूस भाजपसोबत बसणार नाही. बाळासाहेबांचा एक काळ होता. त्यावेळी सेनेत स्वाभिमान होता. आज कितपत आहे ते माहिती नाही असा खोचक टोला पवारांनी लगावला. जर उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान जागा झाला तर कदाचित पुन्हा निवडणूक होऊ शकते असं भाकितही पवारांनी वर्तवलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close