S M L

सेना-भाजप 'सामना' भडकला, शेलारांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा !

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2015 01:37 PM IST

सेना-भाजप 'सामना' भडकला, शेलारांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा !

13 जुलै : शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस वाढतचं आहे. आज 'सामना'तून पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका करण्यात आलीये. काही लोकांना दिवस-रात्र फक्त गटारे दिसतात. महाराष्ट्रात आणि देशातही सध्या एकंदरीत जो गोंधळ चालला आहे तो पाहता कालचा गोंधळ बरा होता अशी भावना लोकात निर्माण होऊ नये. डोळे उघडल्यावर हल्ली जशा फक्त भ्रष्टाचाराच्याच बातम्या दिसतात तशा पिसाळलेल्या कुत्र्यांच्याही बातम्या दिसू लागल्या आहेत अशा शब्दात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव न घेता टीका करण्यात आलीये.

गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. आज सेनेनं आशिष शेलारांचा आपले मुखपत्र 'सामना'मधून खरपूस समाचार घेतलाय. "काही लोक न पिसाळताही चावतात आणि असे चावणे हा ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा परिणाम आहे काय, यावर नामदार चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला पाहिजे. आम्ही काही बाबी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी परखडपणे मांडतो, पण काही राजकीय येडबंबूंना सत्तेची सुस्ती आणि बधिरता आल्यामुळेच त्यांची अवस्था चाळीसगावच्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली आहे असे मानायचे काय? असा सवाल सेनेनं उपस्थित केलाय. तसंच विरोधकांच्या हाती जे फटाके किंवा दारूगोळा दिसत आहे तो त्यांच्या हाती आयताच मिळाला आहे. विधानसभेत विरोधकांच्या भडिमारास सरकारला तोंड द्यावे लागेल असे वातावरण आहे आणि त्यासाठी सरकारची काय तयारी आहे ? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही नव्हे तर भाजपच्याच मंत्र्यांनी उचलला आहे. आता त्यांचीही दृष्टी बिघडली आहे असे कुणास वाटत असेल तर हद्द झाली असे खडेबोलही सुनावण्यात आले.

फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालले आहे आणि शिवसेनेला लोकांना जाब द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचा जन्म फक्त सत्तेसाठी नसून आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी. त्यामुळे याबाबत काही वाकडेतिकडे झाल्यास आम्ही डोळे मिटूनही शत्रूंचा समाचार घेऊ आणि लोकांच्या अंगावर येऊन चावणार्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करू. प्रश्न डोळे मिटण्याचा आणि उघडण्याचा नाही, डोळे उघडे ठेवून बजबजपुरी निर्माण करण्यापेक्षा डोळे मिटून राष्ट्रहिताची स्वप्ने पाहणे चांगले. अर्जुनाने डोळे मिटूनच माशाचा डावा डोळा फोडला होता आणि रावणाने डोळे उघडे ठेवून उचललेले शिवधनुष्य त्याच्याच छाताडावर पडले होते. "समझनेवालों को इशारा काफी है!" असा सल्लावजा टोलाही लगावण्यात आला.

दरम्यान, सामन्यातल्या अग्रलेखात भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव घेतलं नसलं तरी रोख मात्र त्यांच्याकडेच आहे. गेले काही दिवस आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका चालवलीय. यावर कालच शिवसेना आमदार अरविंद भोसले यांनीही जोरदार टीका केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2015 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close