S M L

पावसाच्या दमदार पुनरागमनाचा फटका

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2015 02:30 PM IST

पावसाच्या दमदार पुनरागमनाचा फटका

21 जुलै : महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने मुंबईत पुनरागमन केलं आहे. पावसाने काल रात्रीपासून मुंबई, ठाणे, कल्याण आणि पालघरमध्ये जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने दिलासा मिळाला असला तरी त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

पावसामुळे सकाळी सकाळी तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. पण अकरा वाजेनंतर लोकल सेवा पुन्हा रुळावर आली. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. भिवंडीत तीन बत्ती बाजार पेठेमध्ये 100 पेक्षा जास्त दुकानांमध्ये पाणी घुसलं. निजामपूर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. पद्मानगर, म्हाडा कॉलनी, इदगाह रोड आणि शेलार नदी नाका परिसरातही घरांमध्ये पाणी शिरले.

विरारमध्ये काही गावांचा संपर्क तुटला. चांदिप गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात 21 जण अडकले होते. पण या सर्वच जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नवसई, खराड, घाटाणे या गावांना पुराचा वेढा पडलाय. वसई विरार शहरातही रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, तुळींज, आचोळे रोड, सेंट्रल पार्क इथे गुडघाभर पाणी साचलं होतं.

पालघरमध्येही मुसळधार पाऊस होत असल्याने मुंबई सेंट्रलहून गुजरात आणि इतर राज्यात जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. पालघर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वेरुळावरील खडी वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close