S M L

धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधानभवनात आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2015 01:20 PM IST

धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधानभवनात आंदोलन

21 जुलै : कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज विधीमंडळासमोर विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, धनगरी वेशात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. 'धनगर समाजाला फसवणार्‍या सरकारचा धिक्कार असो', 'येळकोट, येळकोट जय मल्हार' अशा घोषणा देत, विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या अन्य सदस्यांनी आज विधानभवानाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या बाहेर घोंगडी, काठी आणि पारंपरिक पगडी बांधत आमदारांनी धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप धनगरांना आरक्षण मिळालं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विधीमंडळासमोर आंदोलन केलं. सरकारनं आरक्षण देण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात भाग घेतला.

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली नाही. याविषयी आज काय रणनीती आखावी याचा विचार करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली. तसंच राज्यात सध्या गाजणार्‍या चिक्की प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटण्याची चिन्ह आहेते.

दोनच दिवसापूर्वी राज्य सरकारनं आपण पुरवलेली चिक्की निकृष्ट होती अशी उच्च न्यायालायात कबुली दिली आहे. याशिवाय आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री कर्जमुक्तीच्या चर्चेवर उत्तर देणार आहेत. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी जरी यासंबंधी घोषणा झाली असली तरी विधानपरिषदेतल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाकडून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close