S M L

अमित शाहांना पाक धार्जिण्यांसोबतची युती कशी चालते ? - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 23, 2015 11:03 AM IST

uddhav on khadse

23 जुलै : राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे असं म्हणतात, पण मग तिकडे काश्मिरात 'आझाद काश्मीर'वाल्या किंबहूना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य आहे, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

सरकार बदलले तरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकतात, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. राष्ट्रहिताशी कुठलीही तडजोड न करता पाकिस्तानचा मुकाबला करा असा सल्लाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

याशिवाय मोदी सरकारवर नाराजी व्यक्त करत देशात मजबूत सरकार आलं आणि लोकांनाही मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, लोकांचा विश्वास तुटता कामा नये आणि त्यासाठी कामाचा वेग वाढवावा लागेल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यासोबतच अच्छे दिनाचा वायदा आहे, लोकांना फसवता येणार नाही, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

याच मुलाखतीत राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. राज्य सरकारनं कर्ममाफी न करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न केलाय आणि तो यापुढेही करत राहू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर विरोधकांच्या कर्जमाफीच्या मागणीवर टीका करताना माफी गुन्हेगारांना दिली जाते. त्यामुळे शेतकरी हा काय गुन्हेगार वाटतो का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

उद्धव ठाकरे उवाच

प्रश्न - सध्याच्या राजकारणात काहीच घडत नाहीये?

उत्तर - आदळआपट आहे, आरोप-प्रत्यारोप चालले आहेत. विरोधी पक्षांचा बिनपैशांचा तमाशा सुरु आहे. मागच्या पानावरुन पुढे सुरुच असते, पण हेच करत रहायचे का?

प्रश्न - तुम्ही इतक्या लवकर निराश झालात?

उत्तर - मी निराश झालेलो नाही. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे, पण ही सरकारं शिवसेनेची नाहीत. अटलजींच्या काळात घटक पक्षांच्या भावना विचारात घेऊन अटलजी पावलं टाकायचे. आता काय चाललंय?

प्रश्न -  काय चाललंय?

उत्तर - आताही ठीक चाललंय. पुन्हा नव्याने 'एनडीए'च्या बैठका सुरु झाल्या ही चांगलीच गोष्ट आहे. नरेंद्र मोदींकडून देशाला आणि लोकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. मोदीसुध्दा त्यादृष्टीने शर्थ करत आहेत.

प्रश्न -  वादग्रस्त आणि पाकधार्जिणे असा आरोप असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाबरोबर भाजप सत्तेत आहे.

उत्तर - मी काय करु शकतो? हे आश्चर्यकारक आहेच. माझं कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. मोहम्मद सईद यांच्याविषयी आपली काय मतं होती? त्यांचे काय राजकारण होते? हे कसं विसरता येईल. दुसरे असे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात आणि युतीचं राजकारण पुरे करा असं सांगतात, पण तिकडे काश्मिरात 'आझाद काश्मीर'वाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य आहे.

प्रश्न -  आजही महागाई खाली उतरलेली नाहीये. रुपयाची घसरण त्याच वेगाने सुरु आहे, म्हणजे आर्थिक क्षेत्रातही आणखी काही करण्याची गरज आहे का?

उत्तर - आपल्याला प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे ते आधी ठरवायला हवं. जर का सरकार चांगली पावलं टाकत असेल, त्याला विरोधी पक्षांकडून सहकार्य हवं असेल तर त्यांना विश्वासात घेऊन बोललं पाहिजे. एक संवाद विरोधी पक्षांसोबतसुद्धा व्हायला हवा. सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढे जायला काय हरकत आहे? बाकी राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या.

प्रश्न -  आपण सत्तेत आहात, मग तशी सूचना का करत नाही?

उत्तर - करु आता. आता कुठे 'एनडीए'च्या बैठकांना नव्यानं सुरुवात झालीय, पण एकत्र सत्तेत असूनही आमचे नेमके नाते काय? 'हम आपके है कौन' हा जो सिनेमा आला होता, तो प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close