S M L

भुजबळ दुखावले, अजितदादांनी आव्हाडांना सुनावले !

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 10:48 AM IST

भुजबळ दुखावले, अजितदादांनी आव्हाडांना सुनावले !

23 जुलै : राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण, आता आव्हाडांना आपली 'भाषणबाजी' चांगलीच महागात पडलीये. विधानभवनात तेलगी प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादीचे दादा अर्थात अजित पवारांनी आव्हाडांना चांगलंच फैलावर घेतलं. एवढंच नाहीतर अजितदादांनी आव्हाडांना चांगलेच खडेबोलही सुनावले.

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. अजित पवारांपासून सर्वच नेते मैदानात उतरले आहे. पण, यात जितेंद्र आव्हाड जास्तीच उत्साहाने आघाडीवर आहे. 'चिक्की घ्या चिक्की' नाट्य बजावणारे आव्हाड मात्र आता आपल्याच वक्तव्यामुळे पक्षातल्या नाराजीला सामोरं गेले.

सभागृहात तेलगी प्रकरणाचा संदर्भ घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार अनिल गोटे हे तेलगीचे मित्र होते असा उल्लेख केला. त्यामुळे अनिल गोटे चांगलेच संतापले. अनिल गोटे यांनी थेट तेलगी प्रकरणामध्ये माजी पोलीस आयुक्त आर.ए.शर्मा आणि भुजबळ प्रकरण उरकून काढलं. एवढंच नाहीतर आर.ए.शर्मांना आयुक्त करतांना भुजबळांनी 10 कोटी घेतले असा पुराव्यासह आरोप केला. आव्हाड आणि अनिल गोटे यांच्या खडाजंगीमुळे छगन भुजबळ मात्र नाराज झाले. तुमच्या भांडणात जुनं प्रकरण का उकरून काढता असा सूरच भुजबळांनी लावला.

भाजपच्या आमदारांनीही मग छगन भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली. यावरुन विधानसभेत गोंधळ उडाला. त्यामुळे कामकाज तहकूब झालं. हे प्रकरण पक्षाच्या अंगलट येत असल्याचं पाहून अजित पवार यांनी जितेंद्र्र आव्हाड यांना कार्यालयात बोलवून फैलावर घेतलं. तेलगी प्रकरण काढण्याची आवश्यकताच काय होती असा सवाल करत अजितदादांनी आव्हाडांचे कान उपटले. जितेंद्र आव्हाड यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 11:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close