S M L

महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता हवी - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 24, 2015 01:34 PM IST

Uddhav thackrayaa

24 जुलै : राज्यात अस्थिरता संपावी, तसंच भाजपने रितसर पाठिंबा मागितल्यानंतर आपण पाठिंबा दिल्याचं सांगत महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता हवी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतील दुसर्‍या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

'लोकसभा निवडणुकीत एवढ्या वर्षांनंतर नवसाचं मूल झालं आणि नवसाचं मूल असलं की त्याचे लाडकोड अधिक होतात. नव्याची नवलाई असतेच. त्या लाडकोड करण्याच्या काळातच राज्यात निवडणूक झाली. मात्र, मला जुना कोळसा उगाळायचा नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपसोबतचे 25 वर्षांचे नाते तुटल्याचे दुःख आहे. असंही ते म्हणाले.

दरम्यान, काल या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता. त्यामध्येही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचे कान टोचले होते. मात्र त्यावर साधी प्रतिक्रिया देण्याचंही भाजपनं टाळलं होतं.

प्रश्न - मग करार तुटला कसा?(युती कशी तुटली?)

उत्तर - लोकसभा निवडणुकीत बदल हवाचच ही हवा पराकोटीला गेली होती. सत्ताबदल होईल याचा सगळ्यांनाच विश्‍वास होता. मात्र तो इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असं कोणीच स्वप्न पाहिलं नव्हतं, पण तसं ते घडलं. घडलं ते चांगलंच झालंय. मला त्याचा आनंदच आहे. मी स्वत: नरेंद्र मोदींसाठी प्रचार केला. त्यांच्याबरोबर सभा घेतल्या आणि एवढ्या वर्षांनंतर नवसाचं मूल व्हावं तसं हे सरकार आलं.

प्रश्न - त्याचा परिणाम महाराष्ट्रात झाला?

उत्तर - होय. तसं म्हणावं लागेल. नवसाचं मूल असलं की त्याचे लाड अधिक होत असतात. नव्याची नवलाई असतेच. त्या लाडकोड करण्याच्या काळातच महाराष्ट्राची निवडणूक झाली. त्याच्या आधी व नंतर काय झालं त्या खोलात जायचं नाही. पुन्हा तोच कोळसा उगाळल्यासारखं होईल.

प्रश्न -  त्यात युती तुटली.

उत्तर - होय. अनाकलनीय पद्धतीने युती तुटली. तरीसुद्धा शिवसेना एकाकीपणाने झुंजली. एका बाजूला देशाची सत्ता, सर्व सामर्थ्य आणि साधनं, राज्याराज्याचे मुख्यमंत्री उतरले; पण आमच्या हातात काहीच नसताना शिवसैनिक झुंजला. एकाकी झुंजला. एकट्याच्या जोरावर शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले. काँग्रेस-राष्ट्रवादीची तर सगळी धुळधाणच उडाली. शेवटी सत्ता स्थापन करायला भाजपला शिवसेनेची गरज लागली आणि मीसुद्धा फार खळखळ न करता...महाराष्ट्रात खूप दिवसांनी सत्ताबदल घडतो आहे. अस्थिरता संपावी म्हणून भाजपला पाठिंबा दिला.

प्रश्न -  भाजपने आपल्याशी ज्या प्रकारे वर्तणूक केली त्याचं दु:ख होतं का?

उत्तर - आता मी त्या वातावरणात पुन्हा जाऊ इच्छित नाही. कारण आता सरकार काम करतंय, पण युती तोडली गेली याची खंत आजही मला आहे. कारण मी अटलजी, आडवाणी, प्रमोदजी, गोपीनाथीज या सगळ्या लोकांबरोबरच हे राजकारण बघत बघत लहानाचा मोठा झालो आहे. त्या वेळेला राजकारणापलीकडे एक नातं जपलं जात होतं, कळत नकळत

प्रश्न -  सरकार स्थापनेच्या वेळेला किंवा त्या संपूर्ण काळात शिवसेनेला महाराष्ट्रात प्रथमच दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली.

उत्तर - मी पुन्हा एकदा सांगतो की, बर्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होत होता. नाहीतर मग पुन्हा महाराष्ट्रात कदाचित मध्यावधीची शक्यता होती. म्हणजे पुन्हा तो सगळा व्यायाम, तो पुन्हा खर्च, तो पुन्हा सगळा आटापिटा आणि एवढं करून पदरात काय पडणार? म्हणून मला असं वाटलं की चला नवीन जर का चेहेरे येत असतील तर त्यांच्यासोबत राहूया. जेणेकरून महाराष्ट्राच्या आयुष्यात चांगले दिवस येतील.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close