S M L

स्वबळाची भाषा करण्याआधी आत्मचिंतन करा, संघाचा उद्धव ठाकरेंना टोला

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2015 05:36 PM IST

स्वबळाची भाषा करण्याआधी आत्मचिंतन करा, संघाचा उद्धव ठाकरेंना टोला

25 जुलै : शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'तून फडणवीस सरकारला टार्गेट करत टीकेची एकही संधी सोडली नाही. आज संघानेही शिवसेनेला अग्रलेखाला अग्रलेखातून सडेतोड उत्तर दिलंय. संघाच्या 'तरूण भारत'मधून उद्धव ठाकरेंचं नाव घेत खडेबोल सुनावले आहे.  उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा करण्याअगोदर आत्मचिंतन करावं, असा सल्लावजा टोला 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी धुसफूस या ना त्या मार्गाने सुरूच असते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सामनामधून रोज समाचार घेण्यात आला. भाजपच्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण, आता संघानेच शिवसेनेला उत्तर देण्यासाठी त्यांचा मार्ग निवडलाय. आजच्या 'तरुण भारत'च्या अंकातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाची जाणीव करून देण्यात आलीये.

"महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने मागितला म्हणून पाठिंबा दिल्याची जी गुर्मीची भाषा उद्धव साहेब सध्या बोलताहेत, ती बघितल्यानंतर परवा परवापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांनी इथल्या सत्तेत सहभाग मिळावा म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांभोवती घातलेल्या पिंग्याचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला दिसतो.

त्यावेळी सत्तेत सहभागी होण्यासाठीची धडपड नेमकी कुणाची चालली होती, सत्तेतील सहभागाचा निरोप येईपर्यंत घालमेल कुणाची चालली होती, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपासून, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत दररोज उलटसुलट विधाने कोण करत होतं, सत्तेतला सहभाग मिळत नसल्याचे बघून दरम्यानच्या काळात विरोधी पक्षनेतेपद कोणी मिळवलं होतं अन् लागलीच ते पद झिडकारून सरकारमध्ये सहभागी कोण झालं होतं, हे विसरलेत उद्धव ठाकरे इतक्या लवकर? " असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना तरुणभारतच्या संपादकीय मधून विचारण्यात आलाय.

थोडक्यात कायतर आता भाजप सेना युतीमधलं शीतयुद्ध आता 'सामना' आणि 'तरुण भारत'मधूनही चांगलत रंगताना दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2015 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close