S M L

तुकडोजी महाराजांच्या अमरावतीतच दलितांवर वर्षभरापासून बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2015 02:45 PM IST

तुकडोजी महाराजांच्या अमरावतीतच दलितांवर वर्षभरापासून बहिष्कार

12 ऑगस्ट : अमरावती जिल्हा हा संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. पण याचं अमरावती जिल्ह्यातील चिंचोली ब्राम्हणवाडा थडी या गावात गेल्या वर्षभरापासून दलितांवर बहिष्कार टाकण्यात आलाय.

गेल्या वर्षभरापासून दलितांना गावातील किराणा दुकानातून सामान,चक्कीवर दळण आणि दुधवाल्यांकडून दूध बंद असल्याचं गावकर्‍यांनी सांगितलंय. फक्त दलितांच्या समाज मंदिराजवळ रिकाम्या जागेत जाण्यायेण्याचा रस्ता बंद करून सवर्ण समाजाच्या लोकांनी एक झेंडा उभारण्याला दलितांनी विरोध केला म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आलाय.

ब्राम्हणवाडा गावातील इतर लोकांना दलित समाजाच्या लोकांसोबत संबंध ठेवल्यास त्यांच्यावरही बहिष्कार टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोपही दलित गावकर्‍यांनी केला आहे. आता या गावातील दलितांना 1 किमीवर असलेल्या ब्राम्हणवाडा या गावात किराणा आणि किंवा दळण दळायला जावं लागतं.

एवढंच नव्हे तर दलितांना गावकरी शेतात काम करायला सुद्धा बोलावत नाही. यामुळे गावकर्‍यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं दलित महिलांनी सांगितलंय. या घटनेची तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार करूनही प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केलाय.

या घटनेमुळे बहिष्कार

गावातील तत्कालीन सरपंच मायंदे यांनी जबरदस्तीने या रस्त्यालगतच्या जागेवर तारेचे कुंपण घातले आहे, गावचा रस्ता बंद झाल्याने दलितांनी याला विरोध केला. त्यातून गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी दलित आणि सवर्ण यांच्यात संघर्षही झाला होता. यात काही दलितांना मारहाणही करण्यात आली तेव्हापासून हा बहिष्कार कायम आहे.

बहिष्कार टाकल्याच्या घटनेला खुद्द ब्राम्हणवाडा येथील सरपंचानी दुजोरा दिला असून ही बाब योग्य नसल्याची कबुली दिलीये. चांदूर बाजार येथील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्‍यांना या घटनेची माहिती असूनही योग्य कारवाई करीत नसल्याचा आरोप सरपंचानी केलाय. तहसिलदारांनी आदेश दिल्यास हे अवैध घालण्यात आलेले तारेचे कुंपण काढण्यास ग्रामपंचायत तयार असल्याचे सरपंचानी सांगितलं.

ज्यांच्यावर बहिष्काराचा आरोप होतो त्यांनी मात्र बहिष्कार नसून आमचे पटत नसल्याने व्यवहार करत नसल्याचं सांगितलंय.

दलित पँथर चे कार्यकर्ते आंनद वरठे यांनी आता या घटनेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे गावकर्‍याचे लक्ष लागले आहे. वर्षभरापासून जिल्हा प्रशासन गप्प का असाही प्रश्न उपस्थित झालाय.

दरम्यान, हा बहिष्कार टाकणं अयोग्य आहे आणि याबाबत प्रशासनाला तक्रार करूनही दखल घेतली जात नाही असं स्पष्टीकरण गावाच्या सरपंच नंदकिशोर वासनकर यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close