S M L

मुंबईची 'लालपरी' घायाळ, वर्षाला आठशे कोटीचा तोटा !

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2015 06:18 PM IST

मुंबईची 'लालपरी' घायाळ, वर्षाला आठशे कोटीचा तोटा !

प्रणाली कापसे, मुंबई

13 ऑगस्ट : मुंबईतली बेस्ट बस बंद होणं हे कुणाहीसाठी चांगलं नाही. कारण त्याचा परिणाम सर्वच प्रवाशांना भोगावा लागेल. दररोज 25 लाख प्रवाशांची ने-आण करणारी यंत्रणा बंद पडली तर काय होईल हा विचार ही मुंबईकरांना सहन होणारा नाही. बेस्ट हे सर्व सामान्यांचं वाहन आहे. म्हणूनच बेस्ट बस जगावी यासाठी काही महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. बेस्टचे नवे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी त्यासाठी चांगले प्रयत्न सुरू केले आहेत. पण हे प्रयत्न बेस्टला तारू शकतील का असा प्रश्न सर्वांना पडू लागलेय.

रोज मुंबईकरांच्या सेवेत 2600 बसेस...रोज 25 लाख प्रवासी...रोज काम करतात 40 हजार कर्मचारी...रोजचा तोटा -सव्वा 2 कोटी रुपये..!!

मुंबईची लाडकी ही लाल रंगाची बेस्ट आता घायाळ झालीये. तिला तिला दरवर्षी आठशे कोटी रुपयांचा भला मोठा तोटा होतोय.

राज्यातल्या इतर शहरांमधल्या सिटी बसेसना घरघर लागली असताना आता बेस्टही त्याच वाटेवर जाईल की काय, अशी भीती निर्माण झालीये. बेस्टचे प्रवासीही कमी होत चालले आहेत. बेस्टला पुन्हा बेस्ट दिवस यासाठी प्रशासनाने तातडीची आणि महत्त्वाची पाउलं उचलली आहेत.

'बेस्ट' उपाययोजना

बेस्टनं सर्वप्रथम एका बसमागे लागणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या 12 वरुन 8 वर आणलीये

लवकरच मुंबईत काही ठिकाणी फक्त बेस्टसाठी लेन सुरू होणार आहे.

त्यामुळे बेस्टची बस ट्रॅफिकमध्ये न फसता वेळेवर धावेल.

तोट्यात चालणार्‍या काही सेवा बंद करुन नवे मार्ग सुरू केले जाणार आहेत.

बेस्टच्या आस्थापना खर्चामध्ये कपात केली जाणार आहे.

टेलीफोन सारख्या काही सुविधा कमी केल्या जाणार आहेत.

बेस्टचा तोटा इतका वाढतोय की वेळीच कडक पावलं उचलावी लागणार आहेत. आणि त्याच वेळी बेस्टचा वापर राजकारणासाठी करणंही ताबडतोबीने बंद करावं लागणार आहे. नाहीतर आधीच आर्थिक बोझ्याखाली दबलेली बेस्ट सवलतींमुळे मोडून पडेल.

मुंबईत सत्ताधारी असलेल्या सेना-भाजपनं कायमच राज्य सरकारच्या नावाने गळा काढला आहे. आता मात्र तशी परिस्थिती नाही. राज्यात आणि केंद्रातही सेना-भाजपचं सरकार असल्यानं बेस्टला मदत करुन वर काढण्यात काहीच अडचण नाही. पण त्यासाठी मुळात बेस्टला आपली आर्थिक शिस्त पाळावी लागणार आहे. ढिगभर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी कशी होते, यावर बेस्टचं भविष्य ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2015 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close