S M L

दाऊदच्या यूएईतल्या मालमत्तेवर येणार टाच?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2015 03:34 PM IST

दाऊदच्या यूएईतल्या मालमत्तेवर येणार टाच?

17 ऑगस्ट : 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमच्या दुबईतल्या बेनामी संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात यूएईच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मोदी कालपासून (रविवारी) 'वाळवंटातील स्वर्ग' म्हणून ओळखल्या जाणार्‍या संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईच्या दौर्‍यावर आहेत. आज (सोमवारी) औपचारिक चर्चेदरम्यान ते दाऊदच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची मागणी करणार असल्याचे सांगितलं जात आहे.

यूएईमध्ये दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांची मोठी मालमत्ता आहे. यूएईतल्या अनेक कंपन्यांमध्ये त्याचे शेअर्स आहे. शिवाय त्याचा मोठा हॉटेल व्यवसायही आहे. या बेनामी आणि इतर मालमत्तांची यादी भारताकडे आहे. ही यादी भारत यूएईला देणार असल्याचं कळतंय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही पंतप्रधानांसोबत या दौर्‍यात आहेत. त्यांच्याजवळ दाऊदच्या संपत्तीची गुप्त यादी असल्याचं कळतंय. दाऊदचा भाऊ अनिस त्याच्या मेव्हण्याच्या मदतीने दुबईत गोल्डन बॉक्स नावाची कंपनीही चालवतो.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज UAEच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणार आहेत. भारताचं अर्थकारण, ऊर्जा आणि सुरक्षा यांच्या दृष्टीनं आखाती देश महत्त्वाचे असल्याचंही मोदी यांनी या मुलाखतीत म्हटलंय. युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदी आज यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे राज्यकर्ते मोहम्मद बिन रशीद अल मर्कतुम यांच्याशी चर्चा करणार आहेत. दहशतवाद आणि गुंतवणूक हे 2 मुख्य मुद्दे पंतप्रधानांच्या अजेंड्यावर आहेत.

  • मोदींची मशिदीला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीमध्ये आगमन झाल्यानंतर काही तासांमध्येच इथल्या सर्वात मोठ्या मशिदीला भेट दिली. शेख झायेद ही जगातल्या तिसर्‍या क्रमांकाची मोठी मशीद आहे आणि उत्कृष्ट वास्तूरचनेसाठी ती ओळखली जाते. ही मशीद म्हणजे मानवी कामगिरी आणि एकता यांचं उत्तम उदाहरण असल्याची प्रशंसा मोदी यांनी या भेटीदरम्यान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातही कधीही कोणत्याच मशिदीला भेट दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी अबुधाबीमधल्या मशिदीला भेट देणं महत्त्वाचं मानलं जातं आहे.

  • मोदींनी घेतली भारतीय कामगारांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अबुधाबीमध्ये भारतीय कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर मात करण्यासाठी भारत सरकारतर्फे काय मदत केली जाऊ शकते याचीही चर्चा यावेळी पंतप्रधानांनी केली. मोदी यांनी I-CAD रेसिडेंशियन कॅम्पमध्ये भारतीय कामगारांची भेट घेतली. या भागात हजारो स्थलांतरित मजूर राहतात. यावेळी मोदी यांनी कामगारांबरोबर फोटोही काढले.

 

  • अबुधाबीमध्ये मंदिर बांधणार

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये लवकरच पहिलंवहिलं मंदिर बांधलं जाणार आहे. त्यासाठी यूएई सरकारनं जमीन दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी यूएई सरकारतर्फे हा निर्णय जाहीर झालाय. त्याबद्दल मोदी यांनी यूएईच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. यूएईमध्ये फारशी मंदिरं नाहीत. दुबईमध्ये 2 मंदिरं आहेत, पण अबुधाबीमध्ये एकही मंदिर नव्हतं. यूएईमध्ये जवळपास 26 लाख भारतीय राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close