S M L

दाभोलकर-पानसरेंचा खून विचारांसाठी नाही- शेषराव मोरे

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2015 09:44 AM IST

दाभोलकर-पानसरेंचा खून विचारांसाठी नाही- शेषराव मोरे

07 सप्टेंबर : चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा काल अंदमान इथं समारोप झाला खरा... पण संमेलनाध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हे संमेलन भलतंच गाजण्याची चिन्हं आहेत. दाभोलकर-पानसरे यांचा खून हा विचार दडपण्यासाठी झालेला नाही तर कुठल्यातरी माथेफिरुंचं हे काम आहे, असं अजब वक्तव्य मोरे यांनी केलं आहे. हिंदूंच्या जेवढे अधिक विरोधी बोलू तेवढे आपण अधिक पुरोगामी ठरू, असं समीकरण सध्या रूढ झालं आहे. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा प्रतिगामी ठरवला जातो. हा पुरोगाम्यांचा दहशतवाद आहे. याचीदेखील भीती आहे, असं टीकास्त्र प्रा. शेषराव मोरे यांनी चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात शनिवारी सोडले. पोथीनिष्ठ विचारसरणीच्या मार्क्सवादी पुरोगाम्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील वैचारिकतेचं पुरतं वाटोळं केलं असल्याचंही ते म्हणाले.

सावरकरवादी विचारांचा पुरस्कार करतानाच शेषराव मोरेंनी महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यावर फक्त टीकाच केली नाही तर ते तमाम पुरोगाम्यांना दहशवतवादीही ठरवून मोकळे झाले. मोरे फक्त एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दाभोलकर-पानसरेंचा खून हा विचारांसाठी झालाच नसल्याचाही आश्चर्यकारक दावा ठोकून टाकला. पुरोगामी मंडळी दाभोलकरांच्या हत्येचं भांडवल करून विशिष्ट विचारसरणीवर हल्ले करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी IBNलोकमतशी बोलताना केला आहे. शेषराव मोरेंच्या या वादग्रस्त आणि धक्कादायक विधानांवर महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शेषराव मोरे यांचं वक्तव्य हे विकृत असल्याची टीका भाकपचे महाराष्ट्र सरचिटणीस भालचंद्र कांगो यांनी म्हटलं. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी यांनीही मोरेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 07:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close