S M L

दुसरं शाहीस्नान : भाविकांची अलोट गर्दी, पोलिसांवर प्रचंड ताण

Samruddha Bhambure | Updated On: Sep 13, 2015 03:48 PM IST

दुसरं शाहीस्नान : भाविकांची अलोट गर्दी, पोलिसांवर प्रचंड ताण

13 सप्टेंबर : महाकुंभमेळयातील दुसर्‍या शाहीस्नान पर्वणीत आठ आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाले आहे. कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या दुसर्‍या पर्वणीसाठी जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातून भाविकांनी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. आतापर्यंत 23 लाख 9 हजार भाविकांनी शाहीस्नान केल्याची माहिती प्रशासनानी दिली. वाढत्या गर्दीचा परिणाम शाही मिरवणुकीवरही झाला. शाही मार्गावरच्या मिरवणूक पुढे न सरकल्यामुळे प्रशासन आणि यंत्रणेवर ताण आला आणि काही प्रमाणात नियोजनही कोलमडलं. काही ठिकाणी सांधू-महंतांना धक्काबुक्की झाल्यामुळे त्यांनी थेट तलवार उगारल्याच्या घटना घडल्या.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसर्‍या शाहीस्नानाला आज पहाटे तीनच्या सुमारास सुरूवात झाली. द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी सर्वप्रथम शाहीस्नान केलं आणि त्यानंतर साधू, महंतांच्या आखाडय़ांच्या शाहीस्नानाला सुरूवात झाली. शंकराचार्य सरस्वती यांच्या शाहीस्नानानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू, महंतांना शाहीस्नानाचा मान मिळाला. त्यापाठेपाठ अग्नी, जुना आणि आवाहन आखाडय़ांचे शाहीस्नान झालं. शाहीस्नानापूर्वी प्रमुख आखाड्यांनी मिरवणुका काढल्या. सकाळी आठपर्यंत आठ आखाडयांचे शाहीस्नान पूर्ण झाले होते.

श्रावणी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील दुसरं शाहीस्नान आज (रविवारी) नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होतं आहे. हिंदू धर्मात या शाहीस्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतून नागरिक नाशिकमध्ये आले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या शाहीस्नानावेळी भाविकांची गर्दी तुलनेत कमी होती. मात्र, आज अनेक भाविकांनी दोन्ही ठिकाणी शाहीस्नानासाठी घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर गर्दी केली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे तीन वाजल्यापासूनच विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी शाहीस्नानासाठी कुशावर्त कुंडाकडे प्रयाण केलं. चारच्या सुमारास आखाड्यांच्या शाहीस्नानाला सुरुवात झाली. विविध ठिकाणी रांगोळ्या घालून आणि पुष्प सजावट करून साधू-महंतांचे स्वागत करण्यात आलं. त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी जास्त असल्याने पोलीसांना नियोजन करण्यात दमछाक झाली. अनेक भाविक साधू-महंतांच्या स्नानावेळी कुंडामध्ये उतरल्याने पोलीसांनी केलेलं नियोजनही कोलमडल्याच्या घटनाही घडल्या. महापर्वकाळ साधण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारपासूनच कुंभनगरीत दाखल झाले आहेत. शाहीस्नानासाठी 30 ते 35 लाख भाविक दाखल होणार असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2015 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close