S M L

विघ्नहर्ता पाऊस !

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2015 11:31 PM IST

विघ्नहर्ता पाऊस !

18 सप्टेंबर : विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन झाले आणि दुष्काळाचे विघ्न काही प्रमाणात का होईना आता धुसर झाले आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या मराठवाड्यात यंदाही गेल्या 3 महिन्यांपासून पाऊस पडत नव्हता. मात्र, आता गुरुवारी रात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झालाय. हा पाऊस इतका दमदार झाला की, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोरड्या असलेल्या नद्या पाण्यानं तुडुंब भरून वाहू लागल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धरणांमधला पाणीसाठाही वाढला. त्यामुळे आता पाणीटंचाईचं संकट थोड्या प्रमाणात का होईना कमी होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतका मुसळधार पाऊस पडला नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटतेय.

5 वर्षांनंतर धबधबा कोसळला

या दमदार पावसाचा परिणाम होऊन अनेक नद्या भरून वाहू लागल्या आहेतच. तसंच काही धबधबेही पुन्हा जिवंत झालेत. लेण्यांमुळे जगप्रसिद्ध असलेल्या वेरूळमधला सीता धबधबा गेली 5 वर्षं कमी पावसामुळे बंदच होता. आज मात्र तो वाहताना दिसला.

हिंगोलीकर सुखावले

हिंगोली जिल्ह्यातही कालपासून जोरदार हजेरी लावलीये. वसमत, औंढा सेनगाव, कळमनुरी या सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा आता खरीप पिकांना चांगला फायदा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता पाऊस पडल्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळालाय. जिल्ह्यातले नदी नाले या वर्षी पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहताहेत. तर कयाधू नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये.

परभणी जिल्हात दोन दिवसांपासून मोसमातला पहिलाच मुसळधार आणि दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहू लागल्याचं चित्र आहे. तर शेतांमध्ये मोठया प्रमाणावर पाणी साचलंय. परभणीजवळच्या येलदरी धरण क्षेत्रात एकाच रात्री 98 मिमी पाऊस झालाय, त्यामळे पाणीसाठ्यात 2 टक्के वाढ झाली आहे. ही पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होणार आहे. जिल्ह्यातल्या जिंतूर, सेलू तालुक्यातल्या कसुरा, करपरा आणि दुधना नद्यांना पूर आलाय. अनेक ठिकाणचा संपर्क तुटलाय.

 मुंबई-पुणे वाहतुकीला फटका

मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे वाहतुकीलाही बसला. मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली होती. मुंबई-पुण्याला जोडणारे तिन्ही मार्ग ठप्प झाले होते. एक्स्प्रेस वे, जुना हायवे आणि रेल्वे वाहतुकीचा फज्जा उडाला. कामशेत-वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. आता एक्स्प्रेस वेवरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आलीय. कामशेत ते किवळे दरम्यान साचलेलं पाणी ओसरलंय. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपासून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आलीय. वाहतूक सुरू झाली असली तरी ती धीम्या गतीनं आहे.

एक्स्प्रेस वेवर 'पूर'

जुन्या मुंबई पुणे हायवेवर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी धबधब्यासारखं दृष्यं निर्माण झाली होती. याचं कारण म्हणजे डोगरखोर्‍यांमधून पाणी वाहत वाहत रस्त्यावर आलंय आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेहून जुना हायवे बंद करण्यात आलाय. तो अजूनही बंदच आहे. डोंगरदर्‍यातील सगळं पाणी एक्स्प्रेस वेवर आल्याने रस्त्याच्या एका बाजूने पाणी वाहत असल्याचं चित्र आहे. लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कामशेत बोगदा ते उर्से टोलनाक्यादरम्यान रस्त्यावर पाणी साचलं होतं. याशिवाय वडगाव मावळ येथील कुडेवाडा येथे हायवेवर तर तळेगाव-लोणावळा दरम्यान पावसामुळे पाणी साचल्यानं वाहनं हळूहळू चालवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

विदर्भात जोरदार पाऊस

विदर्भात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. वाशीम जिल्हातही झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक गांवाना बसलाय. ढोरखेडा या गावात वादळी वार्‍या सह आलेल्या पावसाने तांडव माजवलं. गावात जवळपास 40 घरांची पडझड झाली असून, यात 13 जण जखमी झालेत, यात जखमी झालेल्या सखुबाई सावळे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अनेक घरावरची छपरं उडालीत, भिंतींची पडझड झालीये. काही झाडे घरांवर उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. गावातील अनेक संसार उघड्यावर आल्यामुळे अनेकांना मंदिराचा सहारा घ्यावा लागला.

गोसीखुर्द धरणाची 19 दारं अर्ध्या मीटरनं उघडली

गोंदिया जिल्ह्यातही दमदार पाऊस होतोय. त्यामुळे गोसीखुर्द धरणाची 19 दारं अर्ध्या मीटरनं उघडण्यात आली आहेत. तर पुजारी टोला धरणाची 7 दारं अर्ध्या मीटरनं उघडण्यात आली आहेत. त्यामुळे नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. विशेषत: धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी पुजारा टोल धरण महत्त्वाचं असतं. हे धरण 85 टक्के भरल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. धानाचं पीक ऐन भरात आलं असताना पावसानं दांडी मारली होती. त्यामुळे शेतकरी काळजीत पडले होते. आता मात्र, शेतकर्‍यांची चिंता कमी झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातला सर्वात मोठा तलाव असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातला तलाव 2 दिवस झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे.

लोअर वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडले

वर्ध्यातही जोरदार पाऊस सुरूच असल्यानं धरणांची पाणी पातळी वाढतेय. लोअर वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडले आहेत.नदीनाले

दुथडी भरून वाहतायत. पुरस्थिती निर्माण झाल्यानं नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

जळगावाला पावसाने झोडपले

तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडतोय. तापी नदीची जिल्ह्यातील पाण्याची पातळी 106 मीटरवर पोहचली आहे. धोक्याची पातळी 111 मीटर आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या हतनुर धरणातून ही विसर्ग सुरू करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 11:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close