S M L

पोलिसांनाही शिक्षा देणार - सनातन

Samruddha Bhambure | Updated On: Sep 20, 2015 05:04 PM IST

पोलिसांनाही शिक्षा देणार - सनातन

20 सप्टेंबर : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला झाल्यावर सनातन संस्थेने आता आणखी विखारी प्रचार करायला सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांनंतर सनातनने आता थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. समीर गायकवाडची चौकशी करणारे कोण पोलिस आहेत यावर आमचं लक्ष आहे, त्यांनाही आम्ही शिक्षा देऊ असं विखारी लिखाण सनातन प्रभातमध्ये करण्यात आले आहे. या संपादकीयवरुन वाद निर्माण झाल्यावर सनातनने माघार घेत 'शिक्षा' हा शब्द प्रातिनिधीक अर्थाने वापरण्यात आला आहे असा अजब खुलासा केलेला आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर सनातन प्रभातच्या संपादकीयमध्ये पोलिसांवरच टीका करण्यात आली आहे. पोलिसांनाच कठोर साधनेची शिक्षा देऊ असे यामध्ये म्हटलं आहे. या लेखावरुन टीका सुरु झाल्यावर सनातन प्रभातने सारवासारव केली. 'शिक्षा हा शब्द प्रातिनिधीक असून साधनेद्वारे व्यक्तीचे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणच व्हावे असा व्यापक आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या निष्पाप नातेवाईकांचा पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली छळ चालू केला असून हे अयोग्य आहे. आध्यात्मिक दृष्टीने सात्विक आणि सज्जन लोकांचा छळ करणं, हे तामसी प्रवृत्तीचं लक्षण आहे. तामसी प्रवृत्ती साधना करूनच नष्ट होऊन ती सात्विक बनू शकते' असं जगावेगळं स्पष्टीकरण सनातनच्या वतीने देण्यात आलं आहे.

दरम्यान, अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सनातनवर बंदीची मागणी केली आहे. धर्माच्या नावावर अधर्मी कृत्य करणार्‍यांवर कारवाई केलीच पाहिजे. सनातनने आता पोलिसांचीही आमच्या पद्धतीनं साधना करु असं वाचनात आलंय, त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनं आता तरी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2015 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close