S M L

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2015 12:38 PM IST

dalmiya_650_030315012127

अमित मोडक, मुंबई

22 सप्टेंबर : भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारे, भारतीय क्रिकेटचं जागतिक स्थरावर वर्चस्वा निर्माण करणारे, आणि भारतीय क्रिकेटला आर्थिक चणचणीतून बाहेर काढून आर्थिक महासत्ता बनवणारे, खेळाला पैसा, प्रसिद्धी, मान मिळवून देणारेबीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने काल (रविवारी) रात्री निधन झाले, ते 75 वर्षांचे होते.

बुधवारी छातीत दुखत असल्याने त्यांना बी. एम. बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण रविवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली होती. दालमिया यांच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टर अनिल मिश्रा यांनी दिली. रात्री पावणेआठच्या सुमारास दालमियांनी अखेरचा श्वास घेतला.

कोलकात्यातील मारवाडी कुटुंबात जगमोहन दालमिया यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय होता. वयाच्या 20 व्या वर्षी दालमिया त्या व्यवसायाशी जोडले गेले. पण त्यांनी नाव कमावलं ते क्रिकेटमध्ये. क्रिकेटची त्यांना पहिल्यापासून आवड होती. स्थानिक क्लबकडून खेळतांना ते विकेट किपींग करायचे आणि त्यांच्यानावावर एक द्विशतकही आहे. पण त्यांच्या कारकिर्दला खरं वळण मिळालं ते 1979मध्ये, यांचं वर्षी ते बीसीसीआयमध्ये आले. तरुण दालमियांना साथ मिळाली ती इंद्रजीतसिंग बिंद्रा यांची, आणि या जोडीचं पहिलं मोठं यश म्हणजे 1987च्या वर्ल्ड कपचं भारतात यशस्वी आयोजन.

पहिल्यांदाच वर्ल्ड कप इंग्लड बाहेर होत होता. त्या वर्ल्ड कपने क्रिकेटची सगळी आर्थिक समीकरणंच बदलून टाकली. आशिया खंडात पहिल्यांदाच क्रिकेटसोबत पैसाही आला होता. त्यानंतर नव्वदीच्या दशकात दालमियांनी क्रिकेटचं व्यावसायीकरण करत बीसीसीआयला जगातला सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवलं. त्यानंतर दालमिया आणि बिंद्रा यांच्यातल्या वैयक्तिक वादामुळे ही जोडी फुटली. पण दालमिया मात्र अधिक सक्षम आणि कणखर बनले.बिंद्राना मागे टाकत त्यांनी क्रिकेटमध्ये आपली आगेकूच सुरू ठेवली.

1997 साली आयसीसीची धुरा सांभाळली, आशियामधून पहिले आयसीसीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यावेळी आयसीसीकडे कर्मचार्‍यांना देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी स्पर्धा भरवत त्यांनी आयसीसीला पैसे मिळवून दिले. भारतीय क्रिकेटची आर्थिक स्थिती डबगाईला आली असताना त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संघटनेला स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. पण त्यांची अतिमहत्त्वकांक्षा त्यांच्या आड आली. त्याचं जसं सगळीकडे कौतुक होत होतं तसंच त्यांच्यापद्धतीवर अनेक जण नाराजही होते. त्यातचं 2000मधल्या टीव्ही हक्काच्या वादामुळे दालमियांना आयसाीसीचं अध्यक्षपद सोडावं लागलं. पण हार मानतील ते दालमिया कसले. 2001मध्ये ते पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याचं वर्षी त्यांनी एका वादात अत्यंत कणखर भूमिका घेतली. माईक डेनेस यांनी पाच भारतीय क्रिकेटपटूंना दंडीत केलं. तो वाद खूप चिघळला, दालमिया यांनी त्या वादात भारताची बाजू अत्यंत कणखरपणे लावून धरत, आयसीसीवर दबावही आणला होता.

2004 च्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्यांनी आपलं मत वापरुन रणबीरसिंग महेंद्रा यांनी निवडून आणलं होतं. शरद पवार पहिल्यांदाच कुठल्याही निवडणुकीत पराभूत झाले होते.पण त्यांचा डाव पुढे पवारांनी त्यांच्यावरच उलटवला. आणि कोलकाता क्रिकेटमधून जवळजवळ त्यांना हद्दपार करून टाकलं. एवढचं नव्हेतर दालमियांवर बीसीसीआयच्या बैठकांना हजर राहण्याचीही बंदी घालण्यात आली, त्यांच्याविरुद्ध एफआयरही दाखल करण्यात आले. पण जेवढी परिस्थिती विरोधात तेवढे दालमिया आणखी जोमानं लढायचे, सगळ्या विरोधांना तोंड देत 2006मध्ये दालमिया बंगाल क्रिकेट असोसिएशनचे पुन्हा अध्यक्ष झाले, पण फक्त 5 महिन्यातचं बीसीसीआयनं त्यांना 1996 वर्ल्डकप निधीमध्ये अफरातफर केल्याच्या आरोपावरुन बाजूला केलं. त्यानंतर दालमियांनी मोठी कायदेशीर लढाई लढली आणि अखेर त्यांंना बीसीसीआयनं निवडणूक लढवण्याची परवानगी दिली.

2007मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फरकानं ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. आणि त्यानंतर आयपीएलमधला भ्रष्टाचार आणि श्रीनिवासन यांच्यावरच्या आरोपानंतर त्यांना संधी निर्माण झाली. जगमोहन दालमिया पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांची कारकिर्द म्हणजे एक संघर्ष आहे. या वर्षी मार्च महिन्यात त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. दालमिया हे फक्त नावापुरते अध्यक्षपद भूषवत होते आणि बीसीसीआयची अन्य मंडळी खासकरून सचिव अनुराग ठाकूर हे सारा कारभार पाहत होते. त्यांना विश्रांती देण्याचा सल्ला देऊन अध्यक्षपद बीसीसीआयमधील एका व्यक्तीला देण्याचा प्रयत्नही धुरीणांकडून सुरु होता. पण बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटला मनी गेम बनवण्यासाठी दालमिया यांनी वापरलेल्या युक्त्या अनेकांना अमान्य होत्या आजही आहेत, पण आजचं भारतीय क्रिकेटचं वैभव आलं ते दालमियांच्या व्यावसायिक चातुर्यामुळे आणि हे त्यांचे शत्रूही मान्या करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2015 07:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close