S M L

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर पालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान 2ला निकाल

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2015 05:19 PM IST

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर पालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान 2ला निकाल

28 सप्टेंबर : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 1 नोव्हेंबर रोजी मतदान आणि दुसर्‍या दिवशीच म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर नवनिर्मित 3 नगरपरिषदा आणि 64 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीही 1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींसाठी 6 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होईल. त्याचबरोबर राज्यभरातील एकूण 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 ऑक्टोबर 2015 तसंच 1 आणि 6 नोव्हेंबर 2015 अशा तीन टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी

पत्रकार परिषदेत केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाचे सचिव डॉ.प्रदीप व्यास उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक होत असलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असेल. आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु, जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणीकरीता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागेल. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल. तसंच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 122 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 61 जागा महिलांसाठी राखीव आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 61 जागा महिलांसाठी राखीव आहेत. दोन्ही ठिकाणी 2 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल.

महानगरपालिका निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा

नामनिर्देशनपत्र देणे,स्वीकारणे: 6 ते 13 ऑक्टोबर 2015

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 14 ऑक्टोबर 2015

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 16 ऑक्टोबर 2015

निवडणूक चिन्हांचे वाटप: 17 ऑक्टोबर 2015

मतदान केंद्र आणि केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी: 17 ऑक्टोबर 2015

मतदानाचा दिनांक: 1 नोव्हेंबर 2015

मतमोजणी: 2 नोव्हेंबर 2015

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकीसाठी

नामनिर्देशनपत्र देणे, स्वीकारणे: 1 ते 8 ऑक्टोबर 2015

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 9 ऑक्टोबर 2015

अपील नसल्यास नामनिर्देशनपत्र मागे घेणे: 19 ऑक्टोबर 2015

अपील असल्यास नामनिर्देशनपत्र मागे घेणे: निकालाच्या तिसर्‍या दिवसापर्यंत

निवडणूक चिन्हांचे वाटप: माघारीनंतर दुसर्‍या दिवशी

मतदान केंद्र आणि केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी: 26 ऑक्टोबर 2015

मतदानाचा दिनांक: 1 नोव्हेंबर 2015

मतमोजणी: 2 नोव्हेंबर 2015

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2015 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close