S M L

भाजप-सेना हे सत्तेला लागलेले मुंगळे, सत्ता सोडणार नाही-पवार

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2015 06:00 PM IST

pawar_on_droght14 ऑक्टोबर : सत्ताधार्‍यांमध्ये कितीही वाद असला तर सरकार टिकेल. भाजप आणि शिवसेना हे सत्तेला लागलेले मुंगळे आहे. त्यामुळे कुणीही सत्ता सोडणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच पूर्वी काही लोक आत्मसन्मानाची भाषा करत होते पण आज तसं दिसत नाही असा टोलाही शरद पवारांनी शिवसेनेला लगावला.

राज्यातील दुष्काळी दौर्‍यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. अपुरा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या वाढलेली दिसते. पण, सरकारने यावर अजूनही कोणतीही उपाययोजना केली नाही. सरकारचे अनेक निर्णय कागदावरच असून अनेक निर्णयांची अद्याप अंमलबजावणीही नाही. एवढंच काय तर राज्य सरकारतर्फे एकाही शेतकर्‍याच्या मुलाचं शैक्षणिक शुल्क भरलं गेलं नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीबद्दल राष्ट्रवादीने अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे असं पवारांनी सांगितलं. यानंतर पवारांनी आपला मोर्चा युती सरकारच्या वादाकडे वळवला.

'सत्तेतून कुणी बाहेर पडणार नाही'

युती सरकारनेमध्ये सध्याची परिस्थिती पाहता एकमेकांविषयी सरकारमधल्या पक्षांची वक्तव्य अशीच चालू राहतील. आताचा वाद पाहिला तर सरकार चालेल की नाही माहित नाही .पण, सरकार टिकेल. शिवसेनेला जर सत्तेतून बाहेर पडून निवडणुका घडवून आणायच्या आहे तर आणाव्यात. त्याचं काय होईल ते उद्याच ठरेल. परंतु, भाजप आणि शिवसेना हे सत्तेला लागलेले मुंगळे आहे. त्यामुळे कुणीही सत्ता सोडणार नाही असा टोला पवारांनी लगावला.

'आता सरकारला पाठिंबा नाही'

आम्ही कधीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळी सरकार अस्थिर झालं होतं. म्हणून पाठिंबा दिला होता. याबद्दल खुलासाही याआधी झालाय. पण, सरकार उद्या अस्थिर झालं तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही असंही शरद पवारांनी जाहीर केलं.

'दादरी प्रकरणी मोदींना आता जाग आली'

दादरी हत्या प्रकरणावरून पवारांनी मोदींवरही टीका केली. दादरीसारख्या प्रकरणावर मोदी इतके उशिरा बोलले, ही चिंतेची बाब आहे, असं पवार म्हणाले. दादरीमध्ये जे झालं, त्यावर केंद्र सरकार काय करणार, हे मोदींचं म्हणणं चूक आहे, असंही ते म्हणाले.

'साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली ती काळजी करण्यासारखी'

आज सहिष्णुता दिसत नाही. काही अतिरेकी पावलांचं समर्थन केलं जातंय आहे. याविरोधात साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातले जाणकार पुरस्कार परत करत आहेत. साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ती काळजी कऱण्यासारखी आहे असं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं.

सनातनवर बोलण्यासारखं काही नाही. सनातन वगैरे संबंधी कोर्टकचेर्‍या सुरू आहेच, अधिक चर्चा योग्य नव्हे. पण, भारतीय संस्कृतीचा जे दाखला देतात त्यांनी अशा धमक्या देण योग्य नाही अशी टीकाही पवारांनी सनातनवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2015 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close