S M L

मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी, 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2015 08:35 PM IST

मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी, 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

17 ऑक्टोबर : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्याला गोदावरी पाटबंधारे मंडळाने मोठा दिलासा दिलाय. मराठवाड्याला 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी पाटबंधारे संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. नाशिक आणि अहमदनगरमधील धरण्यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्यात यावे असंही या आदेश स्पष्ट करण्यात आलंय.जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानूसार हा निर्णय घेण्यात आलाय. पाणी सोडल्यानंतर कायदा सुवस्था राखण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. पाणी ज्या दिवशी सोडण्यात येईल त्या दिवशी पाणी मार्गातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहे.

या हंगामात पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालीये. पावसाळा संपलाय पण मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे. काल शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलीये. यात मराठवाड्यातील तब्बल 8,522 गावांचा समावेश आहे. यात औरंगाबाद, 1353,जालना 969,परभणी 848, हिंगोली 707, नांदेड 1562, बीड 1403, लातूर 943 आणि उस्मानाबादमधील 737 या गावांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍यावर असताना मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणारच असं आश्वासन दिलं होतं. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा ठरवलाय. गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाने मराठवाड्याला 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय.

या आधीही मराठवाड्याला वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं होतं. पण, आमच्या वाट्याचं पाणी मराठवाड्याला का दिलं जात याविरोधात जिल्ह्यातील शेतकरी आणि नेते रस्त्यावर उतरले होते. एवढंच नाहीतर हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला होता. तब्बल 17 वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होता. आता पुन्हा एकदा मराठवाड्याला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाण्यावरुन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडेंचा सरकार घरचा अहेर

भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी साठी सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठवाड्याला शेवटच्या वेळी चमचा पाणी काय पुरवता आम्हालाही पोटभर पाणी द्या, नसता उद्रेक होण्याची शक्यता आहे असा गंभीर इशारा पंकजा मुंडे यांनी सरकारला दिलाय.

नगरकरांचा विरोध

तर दुसरीकडे या निर्णयामुळे मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय तर नगर जिल्ह्यातून या निर्णयाविरोधात शेतकरी, विरोधक तसंच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने प्रखर विरोध दर्शविलाय. त्यांनी जन आंदोलन उभारण्याचा पवित्रा घेतलाय. निळवंडे पाटपाणी कृती समितीनेही या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. धनिकांना लाभ देण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्हयातील शेतकरर्‍यांचं हक्काचं पाणी दिलं जात असल्याने संताप यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरेंनीही पाणी सोडल्यास गावोगावातील जनता नदीपात्रात उतरून संघर्ष करण्याचा इशारा सरकारला दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2015 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close