S M L

भाजपच्या जखमेवर मिठ चोळत सेनेनं नितीशकुमारांवर उधळली स्तुतीसुमनं

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2015 10:40 PM IST

 

uddhav on modi_land_bill09 नोव्हेंबर : बिहार निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपच्या जखमेवर मित्रपक्ष शिवसेनेनं सामनातून मिठ चोळलंय. तर नितीशकुमार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलीये. बिहारात नितीश विजयाचे फटाके वाजले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधावी असा सल्लावजा टोला लगावलाय.

काय म्हटलंय आहे 'सामना'मध्ये ?

दिल्ली विधानसभेचे निकाल ज्यांनी सहजतेनं घेतले त्यांना बिहारचे निकाल गांभीर्याने घ्यावे लागतील. कारण बिहारच्या मैदानात नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी असा जंगी सामना होता. या कुस्तीचा निकाल नितीशकुमार व लालू यादवांच्या बाजूने लागला. बिहारची निवडणूक रणधुमाळी ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आठवण करून देणारी होती. लोकसभा विजयाचे श्रेय मोदी यांनी ज्या अमित शहांच्या हाती ठेवले ते अमित शहा बिहारात तळ ठोकून बसले, पण तरीही भाजपची धुळधाण झाली.

नितीशकुमार यांनी थापा मारल्या नाहीत व बिहारच्या जनतेला विश्‍वासात घेऊन ते काम करीत राहिले. त्यांनी खोटी स्वप्ने दाखवली नाहीत व अपुर्‍या साधनसंपत्तीच्या बळावर ते बिहारला दिशा देत राहिले. त्यांनी गुंडशाहीला टाळे ठोकले आणि कायद्याचे राज्य आणले. त्यांनी सत्तेचा आणि पैशांचा देखावा केला नाही आणि वल्गना ठरणार्‍या गर्जना केल्या नाहीत. ते साधेपणात वागले आणि संपूर्ण प्रचारात सभ्यतेची पातळी सोडली नाही. लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर फक्त दीड वर्षात झालेली ही पडझड आहे.

या पडझडीची जबाबदारी आता कोण घेणार? बिहारात भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील असे शेवटी शेवटी अमित शहांनी सांगितले. पाकिस्तानचे माहीत नाही, पण बिहारात नितीश विजयाचे फटाके वाजले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधायची आहेत. भारतीय जनता पक्षाचे काय चुकले यावर आम्ही पामर काय भाष्य करणार? विनम्रता हा सत्ताधीशांचा फक्त अलंकार नसतो तर संरक्षणाचे हत्यार असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2015 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close