S M L

फ्लॅशबॅक 2015 : युतीची धुसफूस, चिक्की ते डिग्री अन् दिल्ली ते बारामती !

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2015 01:43 PM IST

फ्लॅशबॅक 2015 : युतीची धुसफूस, चिक्की ते डिग्री अन् दिल्ली ते बारामती !

फ्लॅशबॅक 2015...सरत्या वर्षात राज्याच्या राजकारणात फारशी उलथापालथ झाली नसली तरी सत्ताधारी भाजप सेनेतलं कुरघोडीचं राजकारण आणि भाजप-राष्ट्रवादीच्या जवळीकतेने सरतं वर्ष चांगलंच गाजत राहिलं. यासोबत मंत्र्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, आणि भाजपने मित्रपक्षाने मंत्रिमंडळ विस्ताराचं नुसतच दाखवलेलं गाजर अशा एक ना अनेक घडामोडींनी सरतं वर्ष भलतंच गाजलं.

सेना-भाजप धुसफूस

शिवसेना राज्यसरकारमध्ये महिन्याभराच्या अंतराने सामिल झाली खरी....पण अजूनही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री विरोधकांच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत. परिणामस्वरूप आज वर्ष लोटलं तरी भाजप-सेनेत कायमच ताणतणावाचे अनेक प्रसंग बघायला मिळाले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि एकनाथ खडसे यांच्यातल्या अधिकार कक्षेवरून वादाला तोंड फुटलं. त्यानंतर शिवसेनेच्या सर्वंच मंत्र्यांनी हा आरोप लावून धरला. .वर्षभर हे आरोप प्रत्यारोप सुरूच होते.

भाजपचं मुक्काम पोस्ट बारामती !

jetli in baramatiसत्तेच्या राजकारणात सेना-भाजपात अजूनही म्हणावं अस पटलं नसलं तरी विरोधी भूमिकेतल्या राष्ट्रवादीने मात्र, अगदी सत्तास्थापनेच्या आधीपासूनच भाजपशी व्यवस्थित जुळवून घेतलं. विधानसभेचे निकाल लागताच शरद पवारांनी भाजपला न मागताच पाठिंबा जाहीर करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. भाजप-राष्ट्रवादीच्या या पॉलिटिकल अफेअरवर भरपूर टीका देखील झाली. पण तरीही अगदी पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींपर्यंत अशा दिग्गज नेत्यांनी थेट बारामतीत येऊन पवारांचा यथोचित पाहुणचार घेतला. एवढचं काय मुख्यमंत्री, एकनाथ खडसे, गिरीष बापट या राज्यातल्या मंत्र्यांनीही पवारांच्या बाबागाडीतून बारामतीची रपेट मारल्याचं बघायला मिळालं.

केंद्रीय पातळीवर पवार आणि मोदींमध्ये मैत्रीचे सूर जळले असले तरी इकडे महाराष्ट्रात मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मात्री मंत्र्यांनी अडचणीत आणण्याची एकही संधी दवडू दिली नाही. गेले वर्षभर छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि अजित पवार यांच्यावर घोटाळा चौकशीची टांगती तलवार कायम राहिली. इतिहासात पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मालमता ईडीनं जप्त केली. सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशीचा ससेमिरा या नेत्यांच्या मागे वर्षभर सुरूच होता.

दररोज 'सामना'

sena samana on kulkarniसत्तास्थापनेआधीच पवारांनी सेना-भाजपच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकल्याने, शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झाल्याचं बघायला मिळालं.म्हणूनच गेले वर्षभर सामनामधून त्याचे पडसाद उमटत राहिले. विशेषतः दुष्काळ निवारणाच्या अधिभारावरून या दोघात चांगलीच तूतूमैमै झाली. 'सामना'तून सरकारच्या कृतीला चक्क पाकिटमारीची उपमा देण्याची आली.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मग भाजपच्या आशिष शेलारांनी बीएमसीच्या नालेसफाईचा घोटाळ्याचा गाळ उकरून काढला.मरिन ड्राईव्हच्या एलईडी लाईट्सवरूनही शेलार आणि आदित्य ठाकरेंमध्ये चांगलीच जुपली होती. तिकडे दिल्लीतही जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरुन शिवसेनेनं संसदेमध्ये भाजपविरोधात भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. एकूणच सेना भाजपातली ही लव्ह हेट रिलेशनशिप वर्षभर सामान्याचं चांगलंच मनोरंजन करत राहिली.

घटकपक्ष उपाशीच !

raju shetty ramdas athavale jankarसेना-भाजपातल्या या सत्तासंघर्षात महायुतीच्या छोट्या मित्रपक्षांना वर्षभर मंत्रिपदाच्या आशेवरच झुलवत ठेवलं गेलं. प्रत्येकवेळी अधिवेशन आलं की भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्यांचं जागर दाखवलं जाई...पण अधिवेशन संपलं की या घोषणा पुन्हा हवेत विरून जायच्या..त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाईचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची लालदिव्याची इच्छा अपूर्णच राहिली.

पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा आणि तावडेंची डिग्री

pankjamundechikkiscam2युतीच्या सरकारच्या मंत्र्यांनाही वर्षभराच्या आतच भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांना सामोरं जावं लागलं. पंकजा मुंडे यांच्या विभागातील चिक्की घोटाळा भलताच गाजला. अगदी नॅशनल मीडियानेही त्याची दखल घेतली. याच चिक्की घोटाळ्याच्या निमित्तानेच बीडमधल मुंडे विरूद्ध मुंडे हा बहिण-भावातला सत्तासंघर्ष थेट विधिमंडळात जाऊन पोहचला. विधिमंडळातही याच मुद्यावरून मंत्री पंकजा आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात झालेली खडाजंगी चांगलीच गाजली.. विनोद तावडेंच्या कथित बनावट डिग्रीचा मुद्दाही बराचकाळ चर्चेत होता. हे कमी की काय म्हणून मग विरोधकांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं खोटं प्रतिज्ञापत्र आणि दुसर्‍या पत्नीचा मुद्दाही उकरून काढला. याउलट सेनेचे मंत्री मात्र, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत राहिले.

आखाडा पालिकांचा

abad and navi mumbai palikaगेल्या वर्षभरातली सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे मनपा निवडणुका...औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. यातल्या बहुतांश मनपा निवडणुकांमधून सत्तेत एकत्र असलेले सेना-भाजप चक्क परस्परांच्या विरोधात लढले.

कल्याण डोंबिवलीच्या मैदानात तर दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरीच नाहीतर चक्क तोफा धडाडल्या. पण निकाल लागताच हेच दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. कोल्हापूर, नवीमुंबईत मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं. गेल्या वर्षभरात काँग्रेसवाल्यांसाठी एवढीच काय ती दिलासा देणारी बाब होती. याच निवडणुकांमधून मनसेची मात्र, पुरती वाट लागली. त्यामुळे राज ठाकरेंवर उरले पुरता भाषणापुरता अशीच म्हणण्याची वेळ आली. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या इलेक्शनमध्येही हेच चित्रं बघायला मिळालं.

सेनेकडून राणेंना धोबीपछाड

06-Narayan-Raneगेल्या वर्षभरात काँग्रेसचे फायरब्रँड नेते नेहमीप्रमाणेच चर्चेत राहिले पण ते त्यांच्या पराभवांमुळे...वांद्रा पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा नशीब आजमावलं खरं...पण तिथंही नारायण राणेंचा शिवसेनेनं दारुण पराभव केला. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत राणेंनी थेट शिवसेनेनच्या बालेकिल्यात शिवसेनेला आव्हान दिलं खरं, पण पक्षांतरर्गत विरोध, शिवसेना आणि भाजप युती अभेद्य राहिल्यानं नारायण राणे यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद

maha_bhusan_award

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरुन सरत्या वर्षात चांगलंच राजकारण तापलं होतं. शरद पवारांनीही या वादाला पडद्यामागून खतपाणी घातल्याचा आरोप झाला. कारण त्यांचेच मानसपुत्र जितेंद्र आव्हाड हेच पुरंदरेंना जाहीर विरोध करण्यास सर्वात पुढे होते. पण हा वाद हाताबाहेर जाताच पवारांनी काहीशी संयमी भूमिका घेत या पुरस्कार सोहळ्यावर कुठलंही बालंट येणार नाही याची काळजी घेतली. पण तोपर्यंत दोन्ही बाजुनी यच्छेत्त चिखलफेक करून झाली होती. मराठा संघटनांच्या विरोधामुळे राज्य सरकारला हा पुरस्कार सोहळा राजभवनाच्या बंदिस्त हॉलमध्ये घ्यावा लागला. यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे गावोगाव सत्कार होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी पण ती प्रत्यक्षात अंमलात अजूनही येऊ शकलेली नाही.

मांसविक्रीवर बंदी

mira bhiyandar_meatbanगेल्या वर्षभरात युती सरकारचा बीफ बंदीचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. समाजाच्या सर्वच थरांतून या बीफ बंदीच्या निर्णयावर सरकारवर अक्षरशः टीकेची झोड उठली. बीफबंदीचा हा निर्णय विशिष्ट समाजाच्या हितासाठी घेतला असून यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणलीय. अशा शब्दात सरकारच्या या निर्णयावर चौफेर टीका झाली. पण या मुद्यावर सरकार ठाम राहिलं. पर्युषण काळातही सरकारने मांसविक्रीला बंदीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय देखील वादात सापडला.

पुन्हा छमछम ?

535658dance_barया वर्षभरात सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे डान्सबारवरील सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली बंदी...या मुद्दयावरुन विरोधक आणि जनतेनं सरकारविरोधात चांगलीच टिकेची झोड उठवली. डान्सबार बाबत राज्य सरकार न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडू शकले नाही. असाही आरोप झाला. तसंच डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा अध्यादेश काढावा अशीही मागणी विरोधकांनी केली. पण सरकारने अजूनही त्याबाबत काहीच हालचाली केलेली दिसत नाही.

सुरज परमार आत्महत्या प्रकरण

suraj parmarठाण्यातील ख्यातनाम बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणानं राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. बिल्डर, अधिकारी आणि राजकारणी यांच्यातली अभ्रद युती पुन्हा नव्याने चव्हाट्यावर आली. सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाण्यातल्या चार नगरसेवकांना नंतर अटकही करण्यात आली. परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये एका मंत्र्यांचा आणि एका स्थानिक आमदाराचा कोर्डवर्डमध्ये नामोल्लेख झाल्यानेही बरंच राजकारण झालं.

शीना बोरा हत्याकांड

sheena peterगेल्या वर्षभरात गाजलेली आणखी एक हायप्रोफाईल मर्डरमिस्ट्री म्हणजे शिना बोरा हत्याकांड....याच प्रकरणावरून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी देखील झाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी ही एका मीडिया हाऊसची मालकीन असल्याने हे प्रकरण वर्षभर गाजत राहिलं. याच प्रकरणात नंतर इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांनाही अटक झाली. नात्यांची गुंतागूंत आणि प्रॉपर्टीच्या वादातूनच इंद्राणीने आपली मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरो़प आहे. ही हायप्रोफाईल मर्डरमिस्ट्रीने माध्यमांनाही वर्षभर खाद्य पुरवलं.

शरद पवार @ 75

Pawar@75 (3)शरद पवारांच्या अमृत महोत्सवी महोत्सवामुळे वर्षाचा शेवट राष्ट्रवादीसाठी निश्चितच सुखद असा राहिला. विशेषतः दिल्लीतला सोहळा तर सर्वांच्याच नजरेत भरणारा होता. या सोहळ्याला अगदी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत अशा सर्वच दिग्गजांनी आवर्जून उपस्थिती

लावून या सोहळ्याला शब्दशः चारचांद लावले. सोनिया गांधींसह देशभरातल्या दिग्गज नेत्यांनी पवारांच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावत पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. पवारांचा दिल्लीदरबार मराठी माणसासाठी नक्कीच सुखावून जाणारा होता.राज्यातही बराच काळ पवारांचे कौतुकसोहळे झडत राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2015 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close