S M L

फ्लॅशबॅक 2015 : या वर्षात यांना आपण मुकलो...

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2015 03:57 PM IST

फ्लॅशबॅक 2015 : या वर्षात यांना आपण मुकलो...

मावळत्या 2015 या वर्षात विविध क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांची झालेली `एक्झिट` चटका लावून जाणारी होती. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात या दिग्गजांनी आपल्या कार्यकतृत्वानं अमुल्य ठसा उमटवला....

वसंतराव गोवारीकर यांचं निधन

वर्षाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांचं निधन झालं. गोवारीकर हे शास्त्रज्ञ होते, संशोधक होते, लोकसंख्येच्या

प्रश्नाचे अभ्यासक होते तसेच विचारवंतही होते. आपल्या प्रत्येक संशोधनाचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस राहील याचा त्यांनी प्रयत्न केला. हवामानाचा अंदाज वर्तवणारं नवं मॉडेल त्यांनी शोधून काढलं, त्याचा देशातल्या शेतकर्‍यांना फायदा झाला. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते त्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागारही होते. अवकाश संशोधन संस्था इस्रोचे ते प्रमुख होते. अग्निबाण इंधनाच्या बाबतीत त्यांनी केलेलं संशोधन मैलाचा दगड ठरलं. निवृत्तीनंतर त्यांनी खतांचा विश्वकोश तयार केला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठाला नव्या उंचीवर पोहोचवलं होतं.

'कॉमनमॅन' हरपला

r k laxman life journeyसामान्य माणसांच्या हक्कांसाठी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून आयुष्यभर संघर्ष करणारे विख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी 26 जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या व्यथा यांना लक्ष्मण यांनी आपल्या रेषांच्या माध्यमातून आवाज दिला. त्यांच्या व्यंगचित्रांनी आणि त्यातल्या फटक्यांनी अनेक दिग्गजांना घामही फुटला, पण त्यांच्या रेषांनी कुणाच्या पाठीवर कधीच वळ उमटले नाहीत. तर त्यांच्या रेषा या दुख विसरून चेहेर्‍यावर हसू फुलवणार्‍या होत्या. सलग पन्नासवर्ष त्यांच्या रेषांनी समाज मनावर राज्य केलं. त्यांनी रेखाटलेला कॉमन मॅन हा प्रत्येकाच्या मनात अजरामर ठरणार आहे.

आर.आर. पाटील यांचं निधन

r r patil ibnlokmat.tv new (11)सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा आर.आर. पाटील यांचा प्रवास हा लक्षवेधी होता. यावर्षीच्या राजकीय क्षेत्रात आबांचं जाणं हे सर्वाधिक चटका लावणारं होतं. आपल्या साध्या राहाणीनं आबा जसे प्रसिद्ध होते तसेच त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांनी कामावर छाप सोडली होती.

ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी राबवलेल्या गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे आबांची ख्याती सर्वत्र पसरली. गृहमंत्री असताना डान्स बारवर बंदी घालण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. तसंच त्याचं कौतुकही झालं. पण सगळ्या विरोधाला न जुमानता ते आपल्या निर्णयावर कायम राहिले. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. असे काही अपवाद वगळता आबांची कारकीर्द चांगलीच गाजली. आयुष्यात अनेक वादळांशी सामना करणार्‍या आबांनी कॅन्सरशी अखेर पर्यंत झुंज दिली. आबांचं राजकीय क्षेत्रातलं योगदान सर्वांना कायमचं लक्षात राहिल.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या

pansare newज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि पुरोगामी विचारवंत आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या 2015 मधली सर्वात धक्कादायक घटना होती. देशभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे सर्व पुरोगामी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असतानाच पानसरे यांचीही हत्या झाली. दलित, शोषित, वंचित घटकांसाठी त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं. कामगार चळवळ ते नव्यानेच उभी राहिलेली टोल चळवळ अशा प्रत्येक चळवळीमध्ये कॉम्रेड हे कार्यकर्त्यांचे आधार होते.

शिवाजी कोण होता या त्यांच्या पुस्तकानं महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ आणखी घट्ट केली. पानसरे यांच्या हत्येचा तपास आता सीबीआय करत आहे.पोलिसांनी सनातनच्या समिर गायकवाडला अटक करून आरोपपत्रही दाखल केलंय. पण या हत्येच्या मागचे खरे सुत्रधार जेरबंद करा ही लोकांची मागणी आहे. हे सुत्रधार जोपर्यंत अटक होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रवरचा कलंक पुसला जाणार नाही.

शाहीर साबळे काळाच्या पडद्याआड

sahir sable"गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा।।" हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‌यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. 1942 ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांमध्ये शाहीर साबळेंनी महाराष्ट्र गाजवून सोडला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या चळवळीत लोकजागृती करण्यात महत्वांचं योगदान होतं हे शाहिरांच्या गाण्यांचं. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्तनाट्य निर्माण केलं त्यंानी लिहिलेल्या मुक्तनाट्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील पहिला प्रयोगही त्यांनी केला. त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं तर सर्व विक्रम मोडून काढले.

गोविंदराव आदीक यांचं निधन

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 45 वर्ष सक्रीय असलेले मुरब्बी राजकारणी गोविंदराव आदीक यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत

आपल्या कार्यानं ठसा उमटवला. कामगार चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते राष्ट्रीय साखर कामगार फेड़रेशनचे 1995 पासून अध्यक्ष होते. इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी होते. शेतमजूरांच्या ट्रेड युनियनची त्यांनी राज्यात पहिली नोंदणी केली. कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. अनेकदा मुख्यमंत्री पदासाठीही त्यांचं नाव चर्चेत होतं. नंतर शेवटच्या काळात राष्ट्रवादीत काहीसे दुरावले होते.

रा.सू.गवई यांचं निधन

r s gavaiज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू.गवई यांची मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या संसदीय कार्यकौशल्यामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. 1978 ते 1982 विधान परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर 12 डिसेंबर 1986 ते 1988 काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. 1998-99 लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. केरळ आणि बिहारचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं.

'अग्निपंख' विसावले

Kalam diesविख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ, कवी, तत्वज्ञ आणि एक सह्रदयी माणूस...म्हणजेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम...ते युवकांचे प्रेरणास्थान होते. मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा...हा मंत्र त्यांनी देशभरातल्या युवकांना अखेरच्या श्वासापर्यंत दिला.

सर्व जगाचा दबाव झुगारून भारतानं 1974 आणि 1998 मध्ये अणुचाचणी घेतली. राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला. या दोन्ही मोहिमांमध्ये डॉ. कलामांची महत्वाची भूमिका होती. 1998 मध्ये तर ते अणुस्फोट घडवून आणणार्‍या पथकाचे नेतेच होते. भारताचा अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच आहे हे त्यांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांना ठासून सांगितलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी त्या पदाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं त्यामुळे खर्‍या अर्थानं ते लोकांचे राष्ट्रपती ठरले.

 अशोक सिंघल कालवश

Ashok Singhalराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृतीशील स्वयंसेवक असलेले अशोक सिंघल खरे प्रकाशात आले ते विश्व हिंदू परिषदेत आल्यावर...राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू असताना अशोक सिंघल यांनी देशभर दौरा करून या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळवून दिलं. प्रखर भाषणं, कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि काटेकोर नियोजन यामुळे त्यांनी हे आंदोलन देशभर पसरवलं. या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. पण कुठल्याचं संकटांना ते बधले नाहीत. अयोध्येत राम मंदिर बांधणं हे आपलं स्वप्न आहे असं ते शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहिले.

शेतकर्‍यांचा 'योद्धा' हरपला

sharad_joshi_2जागतिक बँकेतली नोकरी सोडून शरद जोशींनी देशात शेतकर्‍यांचं एक नवं वादळ उभं केल. ज्या काळात शेतकरी संघटीत नव्हता...वेगवेगळ्या गटात विभागला होता..त्या सर्व शेतकर्‍यांना एकत्र करून शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या रूपानं पहिल्यांदाच मोठी शक्ती उभी केली. सर्वच पक्षांना त्याची दखल घ्यावी लागली. 80 च्या दशकात त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. शेतकर्‍याला जागतिक बाजारपेठ खुली झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. प्रचंड विरोधाचा सामनाही त्यांना करावा लागला.नंतर त्याच्या राजकीय भूमिकेंवरून वादही झाले पण अखेर पर्यंत ते शेतकर्‍यांसाठी झटत राहिले. मृत्यूनंतरही त्यांनी आपली सर्व संपत्ती कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी दान करून आपल्या शेतकरी निष्ठेचा प्रत्यय दिला.

महाकवी हरपला

mangesh_padgaonkar_banner_new1महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगावकर यांचं आज मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालंय.ते 86 वर्षांचे होते.या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या त्यांच्या काव्यपंक्ती आजही अजरामर आहेत. पाडगावकरांच्या याच कवितेनं अवघ्या महाराष्ट्राला प्रेम करायला  शिकवलं...प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. जगण्यावर शतदा प्रेम करावं. पाडगावकरांच्या अशा एक ना अनेक कवितांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं.

किंबहुना कविता या साहित्य प्रकाराला लोकप्रिय करण्याचं श्रेय देखील पाडगावकरांनाच जातं. बालकवितांपासून प्रेम कवितांपर्यंत त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. उपहासात्मक कविता सादर करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. साधनाच्या सहसंपादकपदापासून त्यांनी करिअरची सुरूवात केली. पण तिथं ते फारसे रमले नाहीत. कारण त्यांच्यातला कवी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच त्यांनी आकाशवाणीवर कविता वाचन सुरू केलं आणि अल्पावधीत पाडगावकर घराघरात पोहोचले.

शुक्रतारा मंदवारा या त्यांच्या गाण्याने तर महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असतानाच त्यांनी तरुणाईला भुरळ पाडली. पाडगावकरांची मिश्किली सर्वांनाच सुखावून जायची.. धारानृत्य, जिप्सी, छोरी उत्सव, विदूषक, सलाम हे त्यांचे कविता संग्रह विशेष गाजले. मीराबाईंच्या गीतांचाही त्यांनी अनुवाद केला. पण नंतरच्या काळात प्रेमकविता आणि पाडगावकर हे समीकरणच बनून गेलं.पाडगावकर कुठेही जावोत..रसिकांची पहिली फर्माईश ही प्रेम कवितांचीच असायची...तर असा हा हसरा कवी आयुष्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्राला जगण्याचा निखळ आनंद देत राहिला..

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2015 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close