S M L

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2016 12:14 PM IST

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं निधन

मुंबई - 19 जानेवारी : ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांचे आज अल्पशा आजाराने मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांच होते. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

टिकेकर हे गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांचं निधन झालं. पत्रकारितेची मूल्य जपणारा विवेकी पत्रकार आणि भरपूर वाचन करणारा संपादक हरपल्याची भावना पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. लोकसत्ताचे संपादक म्हणून टिकेकर यांची कारकीर्द विशेष गाजली. लोकमत वृत्तपत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या स्तंभाचे शिर्षकही वैशिष्टय़पूर्ण असायचे.

भ्रष्टाचारावर सडेतोड लेखन करणारे पत्रकार म्हणून ते प्रासिद्ध होते. युती शासनाच्या भ्रष्ट कारभारावरही त्यांनी आसूड ओढलं होतं. त्यावेळी त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं होतं. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी स्वतःहून पोलीस संरक्षण नाकारलं.

अग्रलेखांवर आधारीत 'अस्वस्थ महाराष्ट्र' हा त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय अनेक विषयांवरील विविध पुस्तकांचे लेखन आणि संपादनही त्यांनी केलं आहे. पत्रकारितेशिवाय अन्य क्षेत्रातही त्यांचा मोठा आवाका होता. टिकेकर यांनी इंग्रजीत मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिला होता. त्यासाठी त्यांनी अनेक दुर्मिळ पुस्तकं गोळा केली होती. अलीकडे ते मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्यानं समाजातला एक सच्चा विचारवंत, उमदा पत्रकार आणि तत्वांशी तडजोड न करणारा संपादक हरपला आहे.

अरुण टिकेकर यांनी भूषवलेली पदं

- नवी दिल्लीतल्या यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेसमधून सुरुवात

- टाईम्स ऑफ इंडियाच्या संदर्भ विभागाचे अध्यक्ष

- महाराष्ट्र टाईम्समध्ये ज्येष्ठ सहाय्यक संपादक

- 1991 ते 2002 : लोकसत्ताचे संपादक

- एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचं अध्यक्षपदही भूषवलं

अरुण टिकेकर यांनी लिहिलेली पुस्तकं (मराठी)

- तारतम्य (लेखसंग्रह)

- जन-मन (लेखसंग्रह)

- स्थळ-काळ (लेखसंग्रह)

- अस्वस्थ महाराष्ट्र (2 खंड)

- काळमीमांसा

- सारांश

- अक्षरनिष्ठांची मांदियाळी

अरुण टिकेकर यांनी लिहिलेली पुस्तकं (इंग्रजी)

- क्लॉयस्टर्स पेल : मुंबई विद्यापीठाचा इतिहास

- पॉवर, पेन अँड पॅट्रनेज

- मुंबई डीइंटलेक्च्युअलाईज्ड्

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close