S M L

छगन भुजबळांना आज कोर्टात करणार हजर

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2016 07:08 PM IST

 छगन भुजबळांना आज कोर्टात करणार हजर

मुंबई – 15 मार्च : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने छगन भुजबळांना काल (सोमवारी) अटक केली आहे. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काल तब्बल 11 तासांपासून छगन भुजबळांची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

छगन भुजबळ सध्या ईडीच्या कार्यालयातच आहेत. मात्र, सकाळी त्यांची वैद्यकीय चाचणीसाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. सकाळी 10 वाजल्यानंतर भुजबळांना सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

आघाडीच्या काळात दिल्लीत उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याचा भुजबळांवर आरोप आहे. तसंच स्वतःच्या फायद्यासाठी विशिष्ट कंपनीला कंत्राट देणं, त्यातून पैसा मिळवत तो बोगस कंपन्यामध्ये गुंतवणं, असा आरोप भुजबळ आणि त्यांच्या परिवारावर आहे. याच प्रकरणात भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

भुजबळांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांची धनंजय मुंडेंच्या घरी बैठक झाली. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारवर टीका केली आहे. सरकार हे सुडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर सरकारचं हे राजकारण आहे, चौकशीला सहकार्य करत असतानाही भुजबळांना अटक का करण्यात आली असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसंच सकाळी पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांना ईडीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीआधी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं. कोणत्याही कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आवाहन केलं आहे. यावेळी बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, भुजबळ यांच्या अटकेची बातमी समजल्यानंतर भुजबळ समर्थक नाशिक, येवला, मनमाड येथे रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको करण्यास सुरुनात केली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केले. मुंबईतही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2016 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close