S M L

शिंगणापूरमध्ये समानतेची गुढी, अखेर तृप्ती देसाई शनी चौथर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Apr 8, 2016 09:20 PM IST

शिंगणापूरमध्ये समानतेची गुढी, अखेर तृप्ती देसाई शनी चौथर्‍यावर

अहमदनगर - 08 एप्रिल : शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणारच असा पवित्रा घेणार्‍या रणरागिणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना आजपर्यंत चौथर्‍यावर जाण्यापासून रोखण्यात आलं. नगरमध्ये प्रवेश बंदी घालण्यात आली. पोलिसांनी कित्येक वेळा ताब्यात घेऊन नगरच्या बाहेर नेऊन सोडलं. एवढंच नाहीतर त्यांना धक्काबुक्कीही झाली. पण, आज अखेर तृप्ती देसाई शनीच्या चौथर्‍यावर पोहोचल्याच. तब्बल शेकडो वर्षांची परंपरा आज मोडीत निघाली असून एका महिलेनं शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन तेलाचा अभिषेक करत दर्शन घेतलंय. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनि शिंगणापूरमध्ये समानतेची गुढी उभारली गेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनी शिंगणापूरचं शनी मंदिर...इथं फक्त पुरुषांचा प्रवेश दिला जातो अशी परंपरा आता इतिहासात जमा झालीये. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका महिलेनं शनी चौथर्‍यावर चढून दर्शन घेतलं होतं. त्यामुळे शैनेश्वर देवस्थानने महिलांना प्रवेश दिला जाणार नाही असं सांगत शनी देवाचा जलाभिषेक केला होता. त्यानंतर शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला.

महिलांना प्रवेश मिळावाच असा आक्रमक पवित्रा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी घेतला आणि शिंगणापूरकडे झेप घेतली.तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला कार्यकतीर्ंनी शनी चौथर्‍यावर जाण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण, कधी पोलिसांनी त्यांना अडवलं तर कधी गावकर्‍यांनी धक्काबुक्की केली. पण, शनी चौथर्‍यावर काही जाता आलं नाही.

अखेर या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होतीय. हायकोर्टाने महिलांना प्रवेश दिला पाहिजे याची अंमलबजावणी करा असे आदेश राज्य सरकारला दिले. हायकोर्टाच्या आदेशानंतरही देवस्थान आणि शिंगणापूरकरांनी महिलांना प्रवेश देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली.

पण, आज शिंगणापूरमध्ये वेगळच नाट्य घडलं. गुढीपाडव्याला दरवर्षी शनीदेवाला जलाभिषेक केला जातो. त्यामुळे चौथर्‍यावर जाऊन अभिषेक करू द्यावा अशी विनंती नागरिकांनी केली. मात्र, या वादामुळे सर्वांनाच जाणं गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आलं होतं. या नियमांना न जुमानता लोकांनी कठडे पार करत जलाभिषेक केला. त्यातच भुमाता ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी सुरक्षा कठडे पार करत चौथर्‍यावर प्रवेश केला आणि शनिदेवाला पुष्पहार अर्पण केला. शेवटी विश्वस्त मंडळानं दर्शन सर्वांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्त्रिया आणि पुरूषांनी रांगेत जावून शनीदेवाचं दर्शन घेतलं.

संध्याकाळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि इतर कार्यकर्त्या शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाल्यात. तृप्ती देसाई यांनी शनी चौथर्‍यावर जाऊन शनीला अभिषेक घालत दर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2016 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close