S M L

महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2016 08:50 AM IST

महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर

14 एप्रिल : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती... मानवता आणि समनतेचा संदेश देणार्‍या महामानवाला सगळीकडेच 'जय भीम'चा नारा देत मानवंदना दिली जात आहे. जगभरात मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंतीला सुरुवात झालीये. ठिकठिकाणी दलित बांधवांनी रात्री 12 च्या सुमारास आपल्या घरावर निळा झेंडा लावून महामानवाला अभिवादन केलं. मुंबई, औरंगाबाद, नागपूरमध्ये सकाळपासून रॅली काढून महानायकाला अभिवादन केलं जात आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भीमबांधवांनी अलोट गर्दी केली आहे.

सातासमुद्रापार जयभीमचा जयघोष

बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जय भीमचा नारा सातासमुद्रापलीकडे निनादला आहे. न्युयार्कमधील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या शिल्पाची मिरवणूक काढली होती. यावेळी हातात अशोकचक्र प्रस्थापित निळ्या रंगाचे झेंडे घेऊन जय भीमचा नारा दिला. टाईम स्क्वेअरमधील उपस्थितांसाठी हा सोहळा फारच वेगळा अनुभव होता.

राजगृह दिवसभरासाठी खुलं

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज बाबासाहेबांच्या दादर येथील निवास्थानी 'राजगृह' दिवसभरासाठी खुलं राहणार आहे. 1934 साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे घर बांधलं होतं. मुंबईतील लाखो अनुयायी राजगृहावर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. मुंबईतल्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे या ठिकाणी राहत होते. 2008 च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. तसंच क्रिकेट विश्वातले सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकारही इथं राहिले आहेत.

कल्याणमध्ये जयंती साजरी

कल्याणमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले आणि वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आलं. कल्याण पूर्व येथील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे संजय गायकवाड़ उपस्थित होते. लवकरच कल्याण पूर्वेतील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आलं. तर कल्याणच्या वालधुनी जयंती उत्सव मंडळाने तर 125 किलोचा केक बनवला होता. काल रात्री 12 वाजता कल्याणच्या डॉ. आंबेडकर उद्यानासमोर हा केक कापण्यात आला. प्रत्येक मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव स्मरणीय राहावा म्हणून अभिनव पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे.

बुलडाण्यात रक्तदान

बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळे इथं 125 लोकांनी रक्तदान केलं. तर खामगावमध्ये रात्री 12 वाजता ढोलताशाच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटण्यात आले. या वेळी खामगाव मधील पूर्णकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ शेकडो भीमसैनिक बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी रात्रीच दाखल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2016 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close