S M L

लातूरमध्ये खडसेंच्या हेलिपॅडसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2016 10:08 PM IST

लातूरमध्ये खडसेंच्या हेलिपॅडसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी

लातूर  - 15 एप्रिल :   मराठवाड्यात आणि लातूरमध्ये तर भीषण दुष्काळ असताना लोकप्रतिनिधींच्या दौर्‍यासाठी मात्र पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या लातूर दौर्‍यात त्यांच्या हेलिपॅडच्या उभारणीसाठी तब्बल 10 हजार लिटर पाण्याची उधळपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आधीच लातूरसह अवघा मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना पाण्याची अशी नासाडी करण्यात आल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठवाडय़ातील जलसाठा 4 टक्क्यांखाली आला असून, तीव्र दुष्काळामुळे लातूरसारख्या भागाला रेल्वेने पाणी पुरवावं लागत आहे. तर दुसरीकडे पाणीसाठय़ाचे संरक्षण करण्याची वेळ आल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतं. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आज लातूर दौर्‍यावर आहेत. पण दुष्काळग्रस्तांच्या मदती देण्याऐवजी पाण्याचीच उधळपट्टी झाल्याने खडसेंचा लातूर दौराच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

लातूर भागात खडसे यांच्या एक दिवसाच्या दौर्‍याचं आयोजन करण्यात आलं होतं. खडसे लातूर इथून थेट औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला दुष्काळी भागाचे पाहणी करण्यासाठी येणार होते. लातूर इथून बेलकूंड हे गाव केवळ 40 किलोमीटरवर आहे. यासाठी हेलिपॅडच्या उभारणीच्या कामासाठी तब्बल 10 हजार लिटर पाण्याची नासाडी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने वाद निर्माण झाला. बेलकूंड गावाला जाण्यासाठी खडसेंनी गाडीतून जाण्याऐवजी हिलिकॉप्टरने जाण्याला पसंती दाखवल्याने तोही टीकेचा विषय ठरला आहे.

पाणीवापराची माहिती नाही - खडसे

याबाबत बोलाना खडसे म्हणाले, हेलिपॅडसाठी पाण्याचा किती वापर करण्यात आला, याची कोणतीच कल्पना मला नाही. तसंच मी स्वत: पाण्याच्या अनावश्यक वापरण्याच्या विरोधात आहे. पण एखादी यंत्रणा तत्काळ उभारण्यासाठी पाणी लागत असेल तर ते वापरलं पाहिजे असं म्हणत पाणी वाया घालणार्‍या अधिकार्‍यांची पाठराखणच खडसे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2016 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close