S M L

संजय घरत पुन्हा वादाच्या भोवर्‍यात, कामात दिरंगाई केल्याचा ठपका

Sachin Salve | Updated On: May 30, 2016 01:22 PM IST

संजय घरत पुन्हा वादाच्या भोवर्‍यात, कामात दिरंगाई केल्याचा ठपका

30 मे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. घरत यांनी 27 गावांच्या कामात दिरंगाई केल्याचा आरोपाचा गोपनीय अहवाल IBN लोकमतच्या हाती लागला आहे.

राज्य शासनानं 27 गावांचा केडीएमसी हद्दीत समावेश केल्यानंतर तिथल्या कामकाजाचं दफ्तर घरत यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र, घरत यांनी वेळोवेळी केलेल्या सुचनांकडे आणि आदेशाकडे कानाडोळा केला आणि त्यामुळे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अपेक्षित वेळेत पूर्ण झाली नाही असं केडीएमसीचे माजी आयुक्त मधुकर अर्दड यांनी स्पष्ट केलं होते. घरत यांच्याकडून अवलंबण्यात येणारी कार्यपद्धती अत्यंत नकारात्मक आणि प्रशासनविरोधी असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असंही अर्दड यांनी शासनाला पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे.

घरत कल्याण-डोंबिवली महापालिकेत सन 1995 पासून कार्यरत असून सहायक उपायुक्तपदी असलेल्या घरत यांनी आतापर्यंत सामान्य प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, बीएसयूपी पुनर्वसन समितीचे प्रमुख, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अशा महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्र निश्चित करण्यास दिरंगाई असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

घरत यांची वादग्रस्त कारकीर्द

- 2014 लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग

- पालिका निवडणुकीदरम्यान गैरवर्तन

- मतदारयाद्या बनवताना हलगर्जीपणा

- मतदान केंद्र निश्चित करण्यात दिरंगाई

- जुलै 2005मध्ये केडीएमटी बस तिकीट घोटाळा

- केडीएमटीमध्ये इंजिन घोटाळा

- केडीएमसीच्या परिवहन तिकीट, इंजिन, डिझेल-फिल्टर यांच्या घोटाळ्यांचे आरोप

- जुलै 2005 च्या प्रलयंकारी महापुर उपक्रमातील तिकिटे भिजल्याचे भासवून या तिकिटांचा गैरवापर

- यात एका वाहकावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला

- या प्रकरणातील जबाबदार अधिकार्‍यांवरील कारवाई प्रलंबित आहे

- इंजिन घोटाळ्याबाबतही एमएफसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल

- इंजिन अदलाबदलप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन कार्यशाळा व्यवस्थापक विश्‍वनाथ बोरचटे, प्रमुख कारागीर अनंत कदम या दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात घरत अक्षम ठरले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2016 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close