S M L

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

Sachin Salve | Updated On: May 30, 2016 10:37 PM IST

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

30 मे : विधानपरिषदेसाठी अखेर भाजपला मित्रपक्षांची जाग आलीये. भाजपने आपली नावं जाहीर केली असून स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तसंच मनसेला जयमहाराष्ट्र करुन भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुजीत सिंह ठाकूर यांनाही उमेदवारी मिळालीये. परंतु, आरपीआय गटाला उमेदवारी देण्यात आली नाहीये.

विधान परिषदचा आखाडा आता चांगलाच तापलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसने नारायण राणे यांना मैदानात उतरवलंय. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना उमेदवारी देण्यात आलीये. सत्ताधारी भाजपने आपल्या 5 जागांपैकी 4 नावं जाहीर केलीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुखमैदानी तोफ समजले जाणारे सदाभाऊ खोत यांना उमदेवारी जाहीर करण्यात आलीये. त्यांच्यासोबतच शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मेटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

खोत आणि मेटे यांच्या नावासोबतच आणखी एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर यांचं. मनसेमध्ये बंड करून भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेची लॉटरी लागलीये. प्रवीण दरेकर हे मनसेकडून नागोठाणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. या पराभवानंतर दरेकर भाजपमध्ये दाखल झाले.

भाजपमध्ये दाखल होण्याचा दरेकरांना फायदा झाला असून थेट विधानपरिषदेचं तिकीट मिळालंय. तर दुसरीकडे आरपीआय गटाच्या पदरात काहीही पडले नाही. रामदास आठवले यांच्या गटाला उमेदवारी मिळाली नाहीये. त्यामुळे रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2016 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close