S M L

जात पंचायतीचा जाच, नववधूची कौमार्य परीक्षा घेऊन मोडला संसार !

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2016 04:44 PM IST

जात पंचायतीचा जाच, नववधूची कौमार्य परीक्षा घेऊन मोडला संसार !

 01 जून : नाशिकमधल्या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कंजारभाट जातपंचायतीने नुकतंच लग्न झालेल्या तरुणीची कौमार्याची परीक्षा घेतल्याची धक्कादायक घटना घडलीये. शिर्डीमधल्या एका मुलीचा 22 मे रोजी नाशिकमधल्या मुलाशी विवाह झाला. मात्र, लग्नानंतर लगेचच नवरीच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ही मुलगी नापास झाल्याचा दावा जातपंचायतीनं केला.

त्यानंतर नवरीला लग्नघरीच सोडून वर्‍हाडी निघून गेले. नवर्‍या मुलानेही जातपंचायतीच्या सांगण्यावरून लग्नही मोडलं. विशेष म्हणजे या मुलीनं पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती. मुलीनं स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला. पण कोणीही तिचं ऐकलं नाही. आता या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रयत्न सुरू आहेत.

काय आहे हे प्रकरण ?

ती एकदम सुंदर तरुणी... विशीतली...उंचपुरी...गोरीगोमटी.... एखाद्या चित्रपटाची नायिका शोभेल अशी ! पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. या 22 तारखेला तिचं लग्न झाले. नवर्‍या मुलाचं अगोदर एक लग्न झालेले... तरीही आनंदाने तिनं त्याला स्वीकारलं. साधारण कुटुंबातली असुनही वडिलांनी कर्ज काढून थाटामाटात लग्न लावून दिलं. सर्व गाजावाजा संपल्यावर अखेर ती वेळ आली. कौमार्याच्या परीक्षेची! वयस्करांनी दोघांना चांगलं तपासून घेतलं. जातीच्या पंचांनी एक पांढरंशुभ्र वस्त्र त्यांच्या हातात दिलं. त्यावर दोघांनी एकत्र झोपायचं असतं. मंडपा शेजारीच एका खोलीत दोघांना सोडण्यात आलं. काही वेळानंतर जातपंचायत बसली. पंचांनी विचारणा केल्यावर मुलानं आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केलं. शेजारी बसलेल्या वडिलांनी मान खाली घातली. शेवटी पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला. तो म्हणजे "माल खरा निघाला की खोटा?" मुलानं हातातली पांढरशुभ्र वस्र पंचांकडं दिलं. पंचांनी ते बारीकपणे बघितलं. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. पंचांनी त्या मुलाकडं बघितलं. मुलानं रागानं उत्तर दिलं, "माल खोटा, खोटा, खोटा..."

एकच शांतता पसरली. पंचांनी लग्न रद्द ठरवलं. तिनं आक्रोश केला. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं. वडिलांनी विनवणी केली. पण पंच हेका सोडायला तयार नव्हते. अखेर मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाच्या सर्व भेटवस्तू जमा करून सोबत घेतल्या. इतकंच नाही तर तिच्या अंगावरचे दागिनेही काढून नेले. वर्‍हाडी तिला तिथेच सोडून निघून गेले. मात्र मंगळसूत्र काढून नेण्याचे ते विसरले नाही. तिसर्‍या दिवशी हा प्रकार कृष्णा चांदगुडे यांना समजल्यानंतर त्यांनी ऍड. रंजना गवांदे यांच्यासोबत तिचं घर गाठलं. लग्नाचं वातावरण आता सुतकासारखं झालं होतं. सर्वच रडत होते.

आणखी दोन मुलींच्या लग्नाच्या काळजीने वडिलांची पोलिसांमध्ये येण्याची तयारी नव्हती. पण काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर 5 दिवस झाले तरी घरासमोरचा मंडप सोडला नव्हता. मुलगी आणि आई हिंमतवान असल्यानं नंतर त्यांनी गुपचूप पोलीस स्टेशन गाठलं. वडिलांनी दोघींना ओरडत घरी नेले, मोबाईल काढून घेतले, नजरकैदेत ठेवलं. जातीचे प्रश्न जातीतच सोडवण्याच्या मानसिकतेने इतर प्रश्न उभे ठाकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2016 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close