S M L

खडसेंची सर्व खाती तुर्तास मुख्यमंत्र्यांकडे, 10 तारखेला युतीच्या बैठकीत वाटप

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2016 09:14 PM IST

खडसेंची सर्व खाती तुर्तास मुख्यमंत्र्यांकडे, 10 तारखेला युतीच्या बैठकीत वाटप

04 जून : अखेर एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा द्यावा लागला. खडसेंनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. आता पुढील काही दिवस खडसेंची सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. त्यानंतर 10 तारखेला शिवसेना आणि भाजपची बैठक होणार त्यांनतर खातेवाटपावर निर्णय होणार आहे.

भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरण, दाऊद कॉल प्रकरण, जावयाची लिमोझीन कार प्रकरण आणि कथीत पीए गजानन पाटील लाच प्रकरण अखेर एकनाथ खडसेंना महागात पडली. चारही प्रकरणात खडसेंवर होत असलेल्या टीकेमुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. खडसेंच्या प्रकरणाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. खडसे प्रकरणाचा निकाल लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर सोपवण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खडसेंवर आरोपाबद्दलचा सर्व अहवाल मागून घेतला होता. त्याचवेळी खडसेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण, हा निर्णय एक दिवस पुढे ढकलला गेला. अखेर आज शनिवारी सकाळी घडामोडींना वेग आला. सोमवारपासून मुक्ताईनगरला मुक्कामी असलेले खडसे मुंबईत अवतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहचले. दीड तास चर्चेनंतर खडसे आपला राजीनामा सोपवून बाहेर पडले.

त्यानंतर दुपारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आणि खुद्द एकनाथ खडसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या राजीनाम्याची घोषणा केली. खडसे फक्त महसूल खात्याचा राजीनामा देतील अशी शक्यता होती. पण, भाजप पक्षश्रेष्ठींनी सर्वच खडसेंच्या सर्वच पदांचा राजीनामा घेतला. आता खडसे यांच्या राजीनाम्यानंतर सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. खडसेंकडे महसूल विभाग, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास, पशुसंवर्धन आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास खात्यांचा भार होता.

यासंदर्भात 10 तारखेला शिवसेना आणि भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीत खडसेंकडे असलेली मंत्रिपद कुणाकडे सोपवायची यावर चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे. त्यामुळे खडसेंकडील असलेली खाती नव्या चेहर्‍यांकडे सोपवली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2016 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close