S M L

शिवसेनेचा अखेर मंत्रिमंडळ विस्तारात सहभाग; मात्र राज्यमंत्रिपदांवर बोळवण

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2016 11:19 PM IST

uddhav-and-devendra 121

07 जुलै :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या बहुतप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचं चित्रं जवळपास स्पष्ट झालं आहे. विस्तारात एकूण 9 मंत्री शपथ घेणार आहेत. तर शिवसेनाही अखेर उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यास राजी झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे दोन आमदार उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील अशी अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या वर्षा बंगल्यावर मंत्रीपदाचे संभाव्य दावेदार असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, भाजपचे सुभाष देशमुख, संभाजीराव निलंगेकर, जयकुमार रावल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीला चंद्रकात पाटील, विनोद तावडे आणि गिरीश बापट हे नेतेदेखील उपस्थित आहेत. या बैठकीत उद्याच्या मंत्रिमडळ विस्ताराच्या आणि खातेवाटपाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतले जाणे अपेक्षित आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलावलेल्या बैठकीला शिवसेना नेत्यांनी दांडी मारली. त्यानंतर शिवसेना उद्याच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार की नाही या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. असे असले तरी, अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालं नसून शिवसेनेची दोन राज्यमंत्रीपदांवर बोळवण करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण होऊन भाजप-शिवसेना वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिपदाच्या नावांची घोषणा केल्यानंतर शिवसेना मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होईल हे स्पष्ट झालं. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर सेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची आशा मात्र धूसर झाल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडून सेनेला कोणतेही कॅबिनेट पद दिलं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलेल्या सेनेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात फारसे काही हाती लागलेले नाही.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या मंत्रीमंडळातल्या गच्छंतीनंतर रिकामं असलेलं महसूल खातं अखेर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पण मग पाटलांकडचं आताचं खातं तसंच ठेवून महसूल दिलं जाईल की सहकार मंत्रीपदी आणखी कुणाची वर्णी लागणार, याबाबत फक्त अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण पाटलांकडचं सार्वजनिक बांधकाम हे सेनेला दिलं जाण्याची शक्यताही वर्तवली जातं आहे. महसूल आणि सहकार अशी दोन्ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे असतील अशीही माहिती मिळतेय. मोदींनी मंत्रीमंडळ विस्तारात नव्या चेहर्‍यांना संधी दिलीय त्यानंतरच्या खातेवाटपात धक्कातंत्र वापरलेलं. तसंच काहीसं धक्कातंत्र राज्यातल्या खातेवाटपातही पहायला मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

 मंत्रिमंडळातील नवे चेहरे

-भाजप

1) मदन येरावार

-मतदारसंघ-यवतमाळ

-तिसर्‍यांदा आमदार

-नगरसेवक ते आमदारपदाचा टप्पा

2) जयकुमार रावल

-मतदारसंघ-सिंदखेडा (धुळे)

-तिसर्‍यांदा आमदार

-पक्षाचा उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा

3) पांडुरंग फुंडकर

-विधान परिषद सदस्य

-भाजपचे ज्येष्ठ ओबीसी नेते

-खासदार, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय

4) संभाजी पाटील निलंगेकर

-मतदारसंघ-निलंगा (लातूर)

-दुसर्‍यांदा आमदार

-तरुण नेतृत्व, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते

5) सुभाष देशमुख

-मतदारसंघ-द.सोलापूर

-दुसर्‍यांदा आमदार

-खासदार, प्रदेश उपाध्यक्षपद भूषवलं, सहकारमधलं मातब्बर नेतृत्व

6) रवींद्र चव्हाण

-मतदारसंघ-डोंबिवली

-दुसर्‍यांदा आमदार

-केडीएमसीत भाजपचं संख्याबळ वाढवल्याचं बक्षीस

7) राम शिंदे

-कॅबिनेटपदी बढती

-मतदारसंघ - कर्जत - जामखेड

-आमदारकीची दुसरी टर्म

-उत्तम कामगीरीमुळे बढती अभ्यासू

-प्रशासनावर उत्तम पकड

-शिवसेना

1) अर्जुन खोतकर

-मतदारसंघ- जालना

-आमदारकीची 4थी टर्म

-युतीच्या काळातही राज्यमंत्री

2) गुलाबराव पाटील

-मतदारसंघ - जळगाव ग्रामीण

-आमदारकीच्या 3 टर्म

-खडसेंचे कट्टर प्रतिस्पर्धी

-मित्रपक्ष

1) सदाभाऊ खोत

-विधान परिषद सदस्य

-प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

-ऊस, दूध आंदोलनाचा आक्रमक, रांगडा चेहरा

2) महादेव जानकर

-अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

-धनगर समाजाचे नेते

-लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना जेरीस आणलं

-पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक

मंत्रिमंडळ विस्तारातले 7 प्रमुख मुद्दे

- तरुण आणि अनुभवी नेत्यांना संधी

- राज्यमंत्र्यापैकी एकमेव राम शिंदेना कॅबिनेटपदी बढती

- शिवसेनेनं दोन्ही मंत्रिपदी ग्रामीण चेहर्‍यांना दिली संधी

- विदर्भाला झुकतं माप, दोन मंत्रिपदं

- पांडुरंग फुंडकरांसारख्या मातब्बर नेत्याचं पुनरागमन

- मित्रपक्षांना स्थान देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

- केंद्राप्रमाणे फडणवीस यांनी सेनेचं दबावतंत्र झुगारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2016 11:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close