S M L

कोपर्डी प्रकरणावरून अधिवेशनात रणकंदन, विरोधक-सत्ताधारी भिडले

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2016 06:53 PM IST

कोपर्डी प्रकरणावरून अधिवेशनात रणकंदन, विरोधक-सत्ताधारी भिडले

19 जुलै : कोपर्डी निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होते. ठिकठिकाणी निदर्शनं, मोर्चे आणि आंदोलन होतं आहे. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. पण, महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं तेच सदस्य अशा संवेदनशील प्रकरणावर एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतांना दिसून आले. विधानभवनात आज कोपर्डी प्रकरणावरून रणकंदन घडलं. विरोधकांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरत 'मुख्यमंत्री कोपर्डी गेले का नाही ?' असा थेट सवाल केला. तर विरोधक या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा प्रतिहल्ला मुख्यमंत्र्यांनी केला.

विरोधकांकडून प्रकरणाचं राजकारण -मुख्यमंत्री

कोपर्डी प्रकरण हे निदंनिय आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीच शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जाईल. या खटल्याची जबाबदारी ही विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्यावर सोपवण्यात आलीये अशी माहिती पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

तसंच या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून फास्ट ट्रॅक कोर्टात रोजच्या रोज सुनावणी घ्यावी अशी विनंती राज्य सरकार करेल. याआधीही मालाड आणि सिंधुदुर्गमध्ये संवेदनशील प्रकरणात राज्य सरकारची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती. हा इतका गंभीर गुन्हा आहे की, डीएनए रिपोर्टसुद्धा गोळा करण्यात आले आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपूर्ण यंत्रणा या प्रकरणाच्या कामासाठी लावली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी सभागृहातील महिलांची एक समिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच राज्यात बलात्काराच्या घटनांची आकडेवारी देवून दावे करू नये,मुळात विरोधक या प्रकरणाचं राजकारण करत आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

नगर काय पाकिस्तानच्या पलिकडे आहे का ? -नारायण राणे

कोपर्डीमध्ये घडलेल्या गंभीर प्रकरणाचं राज्य सरकारला गांभिर्य नाही. उलट राज्य सरकारने स्वत:पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे होती. पण, असं काही घडलं नाही. नववीच्या वर्गात शिकणार्‍या चिमुरडीवर अमानुष अत्याचार होता. बोलता येणार नाही असा अत्याचार या चिमुरडीवर करण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच कसं वाटतं नाही. मुख्यमंत्री विठ्ठलाला साकडं घालू शकता, मातोश्रीवर जाऊन मेजवानीचा आनंद घेऊ शकता, दिल्लीला जाऊ शकता पण नगरमध्ये जाऊ शकत नाही ?, नगर काय पाकिस्तानच्या पलीकडे आहे का ? असा संतप्त सवाल नारायण राणे यांनी उपस्थिती केला.

कायद्याचा जरब बसेल असा कायदा करा-अजित पवार

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाची वादळी चर्चा झाली. या चर्चेत अजित पवारांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि थेट मंत्रालयापर्यंत महिला सुरक्षित नाहीत. कायदा एवढा कठोर करा की सरकारला पीडित महिलेला मदत करण्याची वेळ येऊ नये परखड मतही अजित पवारांनी व्यक्त केलं. तसंच राज्यातल्या आया-बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही अशी जरब बसवणार्‍या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

'देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्या'

तर विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये. तसंच मुख्यमंत्री आपलं अपयश लपवून ठेवण्यासाठी कोपर्डी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी चालढकल करीत होते असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

मुख्यमंत्री कोपर्डीत का गेले नाही ? -धनंजय मुंडे

कोपर्डीत एका शेतकर्‍याच्या मुलीवर बलात्कार झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन का केलं नाही असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुं़डे यांनी उपस्थित केलाय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढीच्या पुजेनंतर कोपर्डीला जाऊ शकले असते पण त्यांनी तसं न करता मातोश्रीवर मेजवानी झोडली असंही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. तसंच राम शिंदेंना कोपर्डीत जाण्यासाठी 48 तास का लागले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरपासून मंत्रालयापर्यंत कुठंच महिला सुरक्षित नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे यांनी यावेळी राज्यात बलात्काराच्या घटनाचे लेखाजोखथााच मांडला आणि आता तरीही काही करणार की नाही असा खडासवाल उपस्थिती केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2016 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close