S M L

"...दुसरो के घरो पर पत्थर नही फेका करते", मुख्यमंत्र्यांकडून राणेंचं वस्त्रहरण

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2016 06:57 PM IST

मुंबई, 20 जुलै : भाजप हा गुंडांचा पक्ष आहे असा आरोप नारायण राणेंनी केला. पण, हा आरोपच कोण करतंय याचंच मोठं आश्चर्य आहे. सिंधुदुर्गात कुणावर किती गुन्हे आहे हे मी सांगितलं तर सर्वच समोर येईल. राणे साहेब "जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरो घरो पर पत्थर नही फेका करते" असा सणसणीत टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं वस्त्रहरण केलं. तसंच तुम्हाला तिन तिन मुख्यमंत्र्यांची सवय असेल. पण मी एकच मुख्यमंत्री आहे आणि मी सक्षम आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला. तसंच कुणावर आरोप करण्याआधी नीट शहानिशा करा मग आरोप करा असे खडेबोल मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना सुनावले.

कोपर्डी प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. कोपर्डी प्रकरणावर पोलिसांनी अजिबात दिरंगाई केली नाही, अवघ्या आठ तासांमध्ये आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणातील नराधमांना फासापर्यंत पोहचवणासाठी पूर्ण प्रयत्न करणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला.

आरोप करताना भान बाळगा, मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडेंना टोला

कोणत्याही मंत्र्यांचे पुराव्याअभावी चिरहरण करणे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मी ज्या आरोपीचा फोटो दाखवला तो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तोच फोटो मी दाखवला. पण, माझ्याआधी तुम्हीच आरोपीचा फोटो सर्वांना दाखवला असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच जर तुमच्याकडे दुसरे अन्य पुरावे असतील तेव्हा आरोपीला शोधण्यासाठी ओळख परेड केली जाते. आता राहिला मुद्दा कोपर्डीत जाण्याचा तर पॉस्को कायद्यानुसार अशा ठिकाणी जाणे योग्य नसते. आपण तिथे गेलो तर कॅमेरे ही सोबतच आले. आणि हे मला आजच कळले. मीही तिथे जाण्यासाठी पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांनी मला तिथे न जाता त्या कुटुंबियांची दुसरीकडे भेट घ्यावी असा सल्ला दिला.

जर गुन्हे दाखल झाले असले तर अशा ठिकाणी जाता येते. पण, तिथे गेल्याने संवदेनशील आणि न गेल्याने असंवेदनशील असं म्हणता येईल का ?, 1985 साली 115 गोवर्‍यांचा मृत्यू झाला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले नव्हते. याचा अर्थ ते असंवेदनशील होते असं नाही. आता आपण एवढ्या घाईने कोपर्डीत धावून गेले.तसंच यवतमाळमध्ये गेले का नाही ?, तिथे 17 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. पण मी असं म्हणणार नाही तुम्ही तिथे गेला नाही आणि कोपर्डीलाच गेला. तुम्ही तुमचं काम करताय मी माझं काम करतो. कोपर्डी प्रकऱणावर मी लक्ष ठेवून आहे. सर्व पोलीस अधिकारी माझ्या संपर्कात आहे. आणि आरोपी हा आरोपी असतो त्याला कुठली जात नसते. त्यामुळे आरोप करतांना जरा भान बाळगा असा सल्लावजा टोला मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्या आरोपांचा समाचार घेतला. राणे यांनी काल चांगलं राजकीय भाषण केलं. बर्‍याच दिवसांनंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिकेत राणेंना पाहिलं. राणे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. पण, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याचा मुद्दा मी नाही तर तो तुम्हीच उपस्थिती केला होता. आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बाबतीत होता. आणि राणे त्यावेळी समोर होते ते जे बोलायचे तेच आम्ही लावून धरायचो असा टोला मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला.

"मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम"

तुम्ही म्हणाले महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री लाभले. पण, मी एकच मुख्यमंत्री आहे आणि सक्षम आहे. 3 मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला असेल.एक रवी इकडे एक रवी तिकडे तसं काही आम्हाला लागत नाही. मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम आहे. तुम्ही म्हणाला मला गृहखातं कळत नाही. होय, मला गृहखातं कळतं नाही. पण मला तुमच्या इतका मला अनुभव नाही. 40 वर्षांचा तुमचा अनुभव आहे. खालपासून वरपर्यंत तुम्ही कारभार पाहिला. मी काय काल परवाच आलोय. मला काय अनुभव आहे. पण एवढंच सांगतो मला किती अनुभव आहे हे माझं काम आणि आकडे बोलतील. माझं मुल्यमापन हे महाराष्ट्राची जनता करेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंना ठणकावून सांगितलं.

राणे साहेब, "दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते"

भाजप हा गुंडांचा पक्ष आहे हे कोण सांगतं. आणि हे कुणी सांगावा हेच आश्चर्य आहे. अंकुश राणे, रमेश जुवेकरांचं काय झालं ? अशा अनेक मागण्या तुम्ही केल्या. याबद्दल आता मी काय सांगायचं. सिंधुदुर्गमध्ये कोणावर किती गुन्हे आहेत हे मी सांगितलं तर सर्वच समोर येईल. पण मी जास्त खोलात जात नाही. पुढे खूप काम करायचंय. त्यामुळे फार बोलणार नाही. सावंतवाडीत किती गुन्हे दाखल आहे याबद्दल मी काही बोलणार नाही. पण "जो काच के घरो मे रहते है वो दुसरो के घरो पर पत्थर नही फेका करते" असा डायलॉग सांगत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर चांगलाच प्रहार केला.

आम्ही सूडाच राजकारण करतोय. ईडी लावतोय,चौकशा लावतो असा आरोप तुम्ही केलाय. पण तुम्ही घाबरू नका. तुमच्यासह पक्षात किती निश्कलंक आहे हे सगळ्यांना माहित आहे. इथं परदेशी कशाला पाहिजेत इथे देशी काय कमी आहेत ? तुमच्या पक्षात लोकांबाबत तुम्ही काय काय बोललात हे सर्वांना माहित आहे. बातमी द्यायला परदेशी कशाला पाहिजे हे खूप आहे असं सांगत पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल तुम्ही काय बोलला हे सर्वांना ठाऊक आहे. आमचा मंत्री गुन्हेगार म्हणून सापडला तर आमचा मंत्री राहणार नाही. पण साप साप म्हणून काठीनं झोडपाल तर आमचा मंत्री राजीनामा देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांना राणेंसह विरोधकांना ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2016 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close