S M L

भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या मंत्र्यांची चौकशी करा -राणे

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2016 06:48 PM IST

 

मुंबई, 21 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी विधान परिषदेत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सांवतवाडीतले फक्त गुन्हे वाचून दाखवले. त्या गुन्ह्यांचा आणि माझा संबंध काय ? असा सवाल राणेंनी उपस्थित केला. तसंच ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या मंत्र्यांची चौकशी करा आणि पारदर्शकता आणा असं आवाहनही राणेंनी दिलं.rane_vs_cm

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी विधानसभेत बर्‍याच दिवसांनंतर कमबॅक केलं. पहिल्याच दिवशी राणेंनी सभागृहात भाजप आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. पण,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसर्‍या दिवशी राणेंची चांगलीच झाडाझडती घेतली. "जिनके घरं शीशे के होते हैं वो दुसरों के घरोंपर पत्थर नही मारा करते" असा डायलॉग म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना इशारा दिला. पण, राणे सहजासहजी ऐकून घेणार्‍यातले नाही. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. तुम्ही जे गुन्हे वाचून दाखवले त्यात माझा काय संबंध आहे. जे गुन्हे आहेत ते वाचूनच दाखवा असं आवाहनच राणेंनी दिलं. कायदा सुव्यवस्थेवर बोलताना मुख्यमंत्र्यांची भाषा ही राजकीय होती. गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणात असल्यानं पोलिसांशी संबंध आला. पण गुन्हे कोणत्या स्वरुपाचे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही असा टोलाही राणेंनी लगावला.

त्यानंतर राणेंनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थिती करत पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा, गिरीष बापटांच्या डाळ घोटाळ्याकडे मोर्चा वळवला. ज्या मंत्र्यांची नावं भ्रष्टाचारात आहेत. त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि त्या पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे. किमान चौकशी तरी लावली पाहिजे. आम्ही पण चौकशी लावली होती ना. मग तुम्ही का चौकशी लावली नाही असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

तसंच बालकांच्या पोषण आहाराचं टेंडर मंत्र्यांनी नाही काढलं तर कोणी काढलं तो कॅबिनेटचा विषय नाही. काहीही झाल तरी एकाही मंत्र्याला काढणार नाही असं मुख्यमंत्री सांगतात. मग लगे रहो असा टोलाही राणेंनी लगावला. जेवढ्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर चौकशी नेमावी आणि मंत्र्यांनी चौकशीला सामोरं जावं. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकता आणावी असं आवाहनही राणेंनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2016 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close