S M L

'सप्रेम भेट, घरी जाऊन पार्सल उघडणे' आणि झाला स्फोट, महिला गंभीर जखमी

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2016 09:33 PM IST

'सप्रेम भेट, घरी जाऊन पार्सल उघडणे' आणि झाला स्फोट, महिला गंभीर जखमी

भिवंडी, 30 जुलै : भिवंडी तालुक्यातील खालिंग गावात पार्सलच्या झालेल्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झालीये. रेखा घरत असं या महिलेचं नाव आहे. त्यांचा मुलगा अभिजीत घरत याचा कुरियरचा व्यवसाय आहे. त्याच्या बाईकवर एक पार्सल ठेवण्यात आलं होतं. हे पार्सल कुतुहलापोटी त्याच्या आईनं उघडलं. पार्सलमध्ये असलेल्या बाटलीचा स्फोट झाला. या स्फोटात रेखा घरत गंभीर जखमी झाल्यात. त्यांना उपचारासाठी मुंबईत केईएम रुग्णालयात हलवण्यात आलंय. दरम्यान घटनास्थळी पोलीसांसह श्वान पथक, फॉरेन्सिक टीमचे तज्ज्ञ या घटनेचा तपास करीत आहेत.

नाशिक महामार्गावरील पडघा जवळील खालींग गावात राहणारे जीवन आणि अभिजित हे पडघा येथे कुरियरचा व्यवसाय करीत असून 28 जुलै रोजी अभिजतच्या मोटर बाईकला एक प्लास्टिक पिशवीत पार्सल ठेवलेले आढळून आले. त्यावर अभिजत यास सप्रेम भेट, घरी जाऊन हे पार्सल उघडून बघणे असे लिहलेले होते. त्याने ते पार्सल घरी आणून ठेवले असता अभिजीत घरी नसताना कुतूहलापोटी त्याची आई नंदा उर्फ रेखा दत्तात्रय घरत यांनी ते पार्सल 28 जुलै रोजी रात्री 07.30 च्या सुमारास उघडले असता त्यामध्ये एक काचेची बॉटल आढळून आली , ती बॉटल डाव्या हातात पकडून तिचे झाकण उघडले असता जबरदस्त स्फोट होऊन नंदा घरत यांच्या हाताच्या चिंथड्या उडून डोळ्यास दुखापत झाली. त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत

हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्याच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. हे पार्सल नक्की कोणी अभिजीतच्या मोटार बाईकला अडकवले होते. त्या सोबतच हे अतिज्वलनशील रसायन बॉटलमध्ये ठेवण्या मागचा नक्की कोणाचा हेतू काय होता ? या मागील उद्देश नक्की काय होता याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या बॉटल मध्ये द्रव्य रूपातील जिलेटीन होते अशी माहिती सुत्रांनी दिलीये. दरम्यान या घटनेच्या तपासाकरीता अभिजीत घरत यास पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2016 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close