S M L

अमरावतीत ऑनर किलिंग, पोलीस अधिकार्‍याकडून जावयाची हत्या

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2016 07:08 PM IST

अमरावतीत ऑनर किलिंग, पोलीस अधिकार्‍याकडून जावयाची हत्या

अमरावती, 12 सप्टेंबर : खोट्या प्रतिष्ठेपोटी पोलीस अधिकार्‍यानं जावयाची हत्या केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आलीये. सचिन सिमोलिया असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सचिन याचं पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ढोके यांच्या मुलीशी लग्न झालं होतं. या लग्नाला तुकाराम ढोके याचा विरोध होता. या विरोधातूनच सचिन यांची 26 एप्रिलला हत्या करण्यात आली. या हत्येचा तब्बल सहा महिन्यानंतर उलगडा झालाय. पोलिसांनी तुकाराम ढोके याच्यासह तिघांना अटक केलीये.

अमरावती येथील सचिन सिमोलिया या युवकाने वॉशिंम येथील शिवानी ढोके या युवतीसोबत 1 एप्रिल 16 रोजी अमरावतीच्या आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. या लग्नाला शिवानीच्या घरच्या लोकांचा विरोध होता. शिवणीचे वडील तुकाराम ढोके हे वाशिम जिल्ह्यातील हातगांव पोलीस ठाण्यात पीएसआय पदावर कार्यरत आहे. 25 एप्रिल रोजी फोन करून ढोके यांनी शिवानीला आणि सचिन यांना लग्नासाठी जायचे आहे असं सांगून कारंजा येथे बोलावलं. सचिनला फिरायला घेऊन जातो असं सांगून तुकाराम ढोके त्यांचा मुलगा तुषार ढोके आणि भाचा प्रवीण आगलावे या तिघांनी सचिनच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दोरीने गळा आवळला आणि रात्रीच्या दरम्यान मोखाडच्या जंगलात तुरीच्या गंजीवर जाळून टाकलं.

सचिनच्या आईने फ्रेझरपुरा पोलिसांत मुलगा गायब असल्याची तक्रार दाखल केली. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलाला ढोके यांनी मारल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, फ्रेशझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्राम यांनी सचिनच्या आईला पिटाळूम लावलं. अखेर या प्रकरणी रिपाई गवई गटाच्या कार्यकर्त्यानी पोलीस आयुक्तालयासांवर आंदोलन केलं.

हा तपास पोलीस आयुक्त शशिकुमार मीना यांनी हाती घेतला आणि या प्रकरणात तब्ब्ल साडे चार महिण्यानंतर सचिनचा खून पीएसआय तुकाराम ढोके त्यांचा मुलगा तुषार ,भाचा प्रवीण यांनी केल्याच्या निष्कर्षावर आलं. अमरावती पोलिसांनी तुकाराम,तुषार,प्रवीण यांना 2 दिवसापूर्वीच ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखवताच सचिनचा खून केल्याची कबुली दिली.पोलिसांनी हा तपास आता वाशीम पोलिसांकडे दिलाय. यात पोलिसांनी सचिनची पत्नी शिवानी आणि तुकाराम ढोके याच्या पत्नीलाही अटक केली.

आज सचिनच्या आईसह रिपाई कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तलयावर धडक दिली. काही संतप्त कार्यकत्यांनी ठाणेदार आत्राम याना धक्काबुक्कीही केली. या प्रकरणात फ्रेझपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी प्रचंड दिरंगाई तसंच आरोपीना पाठीशी घातल्याचा आणि सचिनच्या आईलाच धमकावल्याचा आरोप रिपाई कार्यकर्ते सचिनच्या कुटुंबीयांनी केला. पोलीस आयुक्त दत्त्तात्रय मंडलिक यांनी आत्राम यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2016 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close