S M L

पंकजांच्या भुजबळ भेटीतून अजित पवारांनी शिकावं, सेनेचा टोला

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2016 10:22 AM IST

पंकजांच्या भुजबळ भेटीतून अजित पवारांनी शिकावं, सेनेचा टोला

मुंबई, 23 सप्टेंबर : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंच्या भुजबळ भेटीवर शिवसेनेनं तोंडसुख घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावलाय. पंकजांनी थकलेल्या काकांची भेट घेतली यात गैर काय ? पण पटेल, पवार, तटकरे यांनी यातून काही तरी शिकावे असा सल्लावजा टोला शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'मधून लगावलाय.

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. मागील आठवड्यात तब्येत खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजपच्या नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

आज सत्ताधारी असलेला शिवसेनेनं पंकजांची पाठराखण करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले. आज भुजबळ जात्यात असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी सुपात आहेत. निदान आतले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे तांडव बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणा•याच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे अशा शब्दात सामनातून पवारांना टोला लगावलाय.

तसंच भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच साहेब, भुजबळसाहेब म्हणून उदो उदो करीत होते. भुजबळांच्या राजकीय मंचावरील नाट्यमय भाषणांना आणि विधिमंडळातील ठोसेबाजीला दाद मिळत होती. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही असा चिमटाही राष्ट्रवादीला काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2016 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close