S M L

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा, सेनेची मागणी

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2016 10:59 PM IST

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा, सेनेची मागणी

28 सप्टेंबर : व्यंगचित्रावरुन शिवसेना बॅकफूटवर गेलेली असतानाच आता मराठा मोर्चांचा शिवसेनेला कळवळा आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या राज्यपालांना भेटणार आहेत. मराठ्‌यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडं करणार आहेत.

सामनामध्ये छापन्यात आलेल्या व्यंगचित्रामुळे शिवसेनेला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. राज्यभरात सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली. तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या कार्यालयावर हल्ले चढवले. आज या प्रकरणी कार्टूनिस्ट प्रभू सरदेसाई यांनी जाहीर माफी मागितली. तसंच सुभाष देसाई यांनीही ते व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नाही असं स्पष्ट केलं. आता मराठा समाजाच्या रोषावर मलमपट्टी करण्यासाठी शिवसेनेनं नवा मुद्दा पुढे केलाय. मराठ्‌यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे करणार आहेत. मराठा मोर्चांसंदर्भात शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत.

शिवसेनेला बदनाम करण्यासाठी विनाकारण व्यंगचित्राचा वाद निर्माण केल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंनी केलाय. सामनात छापून आलेल्या व्यंगचित्राचा आणि मराठा मोर्चांचा संबंध नसल्याचा आरोप आदित्य यांनी केलाय. शिवसेनेविरोधात हे राजकीय षडयंत्र असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2016 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close