S M L

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो,उद्धव ठाकरेंचा माफीनामा

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2016 08:23 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो,उद्धव ठाकरेंचा माफीनामा

01 ऑक्टोबर : मराठा मोर्च्यावर 'मुका मोर्चा' अशा आशयाचे व्यंगचित्र शिवसेनेला चांगलेच महागात पडले. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समोर येऊन मराठा समाजाची माफी मागावी लागली. व्यंगचित्रामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून नेहमी विरोधक आणि मित्रपक्षांवर आसुड ओढला जातो. पण त्याच सामनामधून मराठा समाजाच्या मोर्च्यावर 'मुका मोर्चा' अशी खिल्ली उडवणारे व्यंगचित्र रेखाटण्यात आले. या व्यंगचित्रामुळे राज्यभरात मराठा समाजाने सामनाच्या अंकाची होळी केली. एवढंच नाहीतर नवी मुंबई आणि ठाण्यात कार्यालयावर हल्ले झाले. भरात भर म्हणजे बुलडाण्याचे आमदार आणि खासदारांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले होते. या वादावर व्यंगचित्रकार प्रभूदेसाई यांनी जाहीर माफी मागितली. तसंच सेनेचे नेते सुभाष देसाई यांनीही दिलगिरी व्यक्त केली. तर संजय राऊत यांनी मात्र माफी मागण्याचा प्रश्न नाही अशी भूमिका घेतली होती.

आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या वादावर पडदा टाकला. त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. ज्या कुणा माता-भगिनीच्या भावना दुखावल्या असेल तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि सामनाचा संपादक शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सर्वांची जाहीर माफी मागतो असा माफीनामाच उद्धव ठाकरे यांनी सादर केला.

तसंच जो भगवा मराठा मोर्च्यात आहे. तोच भगवा आमच्याही हातात आहे. त्यामुळे ती माणसंही आमची आहे. पण या सगळ्या प्रकणात काही लोकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवर विश्वास कायम आहे. त्यांनी अशा लोकांचा हा प्रयत्न हाणून पाडलाय. महिलांच्या भावना दुखवणारा तो शिवसैनिक असू शकत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने भूमिका मांडली पाहिजे. त्यासाठी एक दिवशीय अधिवेशन बोलावे अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच पाकिस्तान आणि इतर विषयावर सविस्तरपणे दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2016 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close