S M L

युती तोडा मग आम्ही सर्जिकल स्ट्राईक दाखवतो -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2016 09:57 PM IST

युती तोडा मग आम्ही सर्जिकल स्ट्राईक दाखवतो -उद्धव ठाकरे

मुंबई, 11 ऑक्टोबर : रथी महारथींचा अश्वमेध शिवसैनिकांनी महाराष्ट्रात रोखला. अजूनही फरफरी बाकी असेल तर युती तोडा आणि अंगावर या. तुम्ही पाठीवर वार न करता, समोरुन वार करा मग आम्ही आमचा सर्जिकल स्ट्राईक दाखवून देऊ असा थेट इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. तसंच मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण किंवा आम्ही त्याला न्याय हक्क म्हणतो ते मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 'शिवतीर्था'वर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे एकाप्रकारे रणशिंग फुकतं भाजपला थेट आव्हान दिलंय. 25 वर्ष ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच अंगावर आले आहे. अशा अनेक रथी महारथीचे अश्वमेध या शिवसैनिकांनी महाराष्ट्रात रोखले आहे. जर अजूनही फरफरी बाकी असेल तर युती तोडा आणि अंगावर या. हा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे. पण,पाठीवर वार न करता, समोरुन वार करा मग शिवसेना सर्जिकल स्ट्राईक काय असते ते दाखवून देईल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तसंच भाजपमध्ये मधून कुणी उठतं आणि नारेबाजी सुरू करतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी युतीवर बोलणार जबाबदार व्यक्ती निवडावा अशी विनंतीही उद्धव ठाकरेंनी केली.

'जे चांगलं केलं त्याचं कौतुकच'

पाकव्यापत भूमीत जाऊन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याबद्दल जवानांचे प्रथम अभिनंदन करतो. . पाकिस्तानला मर्दासारखं उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच योग्य पाऊल उचलून देशाला अभिमान वाटेल अशी कारवाई केली. सर्जिकल स्ट्राईकबद्दल पंतप्रधान मोदींचं फोन करुन अभिनंदनही केलंजे चांगलं झालं त्याचं कौतुक होईलच. पण याचा असा अर्थ नाही की, आम्ही त्यांच्यासोबत चाललोय. उलट आम्ही तर म्हणतो, पाकिस्तानही हिंदुस्तान म्हणून जगाच्या पाठीवर दिसला पाहिजे अशी कारवाई करा अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली.

रक्ताची दलाली कुठून शिकलात ?

शहीद जवानांच्या रक्ताची दलाली केली असा आरोप मोदींवर करताना हा शब्द कुठुन शिकला ?, बोफोर्स घोटाळ्यामधून शिकलात का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना विचारला. ते पुढे म्हणाले, मोदींवर जे आरोप करायचे ते करा पण शहीद जवानांना घेऊन असं घाणरेडं राजकारण करू नका. सर्जिकल स्ट्राईक झालंच नाही असा आरोप करता. मुळात असा आरोप करणा•या काँग्रेस नेत्यांच्या धमन्यांत कराचीचं गटारीचं घाण पाणी आहे की काय अशी शंका येते. सैनिकांवर अविश्वास दाखवणारे करंटे भारताची अवलाद नाही. कदाचित ती पाकिस्तानचीच अवलाद असेल अशा शिवराळ भाषेत उद्धव ठाकरे यांनी संजय निरुपम यांचा उल्लेख न करता सडकून टीका केली.

'आर्थिक निकषांवर आरक्षण म्हणजेच न्याय हक्क द्या'

आज लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे मराठा समाजातली खदखद या मोर्चातून समोर आलीये. याआधीही आम्ही आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी केली होती. आताही मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे उलट हे त्यांचं न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी इतर कोणत्याही आरक्षणला धक्का लावू नका असं स्पष्ट केलं. तसंच मुस्लिमांना धर्माच्या आधारावर सवलती देण्याऐवजी आर्थिक निकषांवरच सवलती द्या अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.

'...तर ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा'

मराठा क्रांती मोर्च्यात ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी होत आहे. राज्यात अनेक भागात ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलंय. त्यामुळे ऍट्रॉसिटी कायद्याचा जे कुणी गैरवापर करत आहे त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. जे काही बदल जरूरी वाटत असले तर ते नक्की करावे अशी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी मांडली.

'पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी अपक्षांचाही प्रचार करावा'

पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. पण, ही पद विसरुन आप आपल्या पक्षाच्या प्रचाराला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हजर राहतात. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे पद सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करू नये. जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर ते मुख्यमंत्री म्हणून अपक्षांचेही आहे. त्याचाही प्रचार करावा अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

'मी माता भगिनींची माफी मागितली'

व्यंगचित्राचा वाद विनाकारण पेटवला गेलाय. त्याबद्दल मी माता भगिनींची माफी मागितली आहे सोनिया गांधींची नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विखे पाटलांना टोला लगावलाय. तसंच व्यंगचित्र प्रकरणी आग लावण्याचा प्रयत्न झाला, आग लावणा•यांना शोधून काढा असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दिवाळीनंतर प्रत्येक शाखेला भेट देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close