S M L

जपान अवकाशात घडवणार उल्कापात

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2016 08:14 PM IST

जपान अवकाशात घडवणार उल्कापात

29 ऑक्टोबर :  असं म्हणतात...आकाशातून तारा निखळताना तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केलीत तर तुमची ती इच्छा पूर्ण होते. ता-यांनी गच्च भरलेलं आकाश दिसलं की आपण म्हणूनच एखाद्या अशा ता-याच्या शोधात असतो. शहराच्या धकाधकीत, प्रदूषित हवेत असं तारांकित आकाश दिसणं तसं मुश्कील आहे म्हणा. पण ता-यांनी भरलेलं अख्खं आकाश आणि निखळणा-या उल्का तुम्ही आता कधीही बघू शकता. जपानमध्ये असा तारांकित आकाशाचा एक अनोखा प्रयोग सुरू आहे.

जपानचे तंत्रज्ञ आकाशामध्ये एक उपग्रह सोडणार आहेत. या उपग्रहातून चमचमणा-या ता-यांचा नजारा दिसू शकतो. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितके तारे आकाशातून निखळू शकतात ! एखादा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी आतषबाजी केली जाते. पण उपग्रहाने तयार केलेलं हे अख्खं तारांगण जर आकाशात अवतरलं तर किती बहार येईल. मनात ही नुसती कल्पना आणली तरी आपल्या डोळ्यासमोर ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा किंवा सांगता सोहळा उभा राहतो. अगदी बरोबर आहे ! जपानची 2020 च्या टोकिओ ऑलिम्पिकची तयारी चाललीय ! अशा प्रकारचं विराट तारांगण आपल्याला ऑलिम्पिकच्या सोहळ्यात अनुभवता येऊ शकतं.

ऍले या कंपनीचे संशोधन संचालक शिनसुके आबे या संकल्पनेबद्दल भरभरून सांगतात. जपानमधले लोक सतत कामात व्यग्र असतात. या व्यग्रतेमध्ये त्यांना शांततेचे क्षण त्यांना अनुभवता यावेत यासाठी आम्ही हा प्रयोग राबवतोय, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

आकाशातून तारे निखळतात तेव्हा त्यांचा वेग प्रचंड असतो. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच उल्का आकाशातून पडते आणि आपण पुन्हा तारा निखळण्याची वाट पाहत राहतो. पण या उपग्रहाने सोडलेले तारे थोड्या कमी वेगात पृथ्वीकडे झेपावतील. त्यामुळे त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. शिवाय या ता-यांचा चमचमता प्रकाश वेगवेगळ्या रंगांचा असेल. त्यामुळे रंगीबेरंगी तारे निखळताना आकाशही वेगवेगळ्या रंगांच्या झोतांनी सजेल.

अवकाशातून मोठ्या प्रमाणात उल्कापात होणार असतो तेव्हा खगोलप्रेमी हा उल्कापात पाहण्यासाठी मुद्दाम जातात. पण ढगाळ हवामान, प्रदूषण यामुळे हा उल्कापात अपक्षेप्रमाणे सुंदर दिसतोच असं नाही. आता मात्र जपानचा हा प्रयोग यशस्वी झाला तर आपल्याला हा अनोखा आकाशसोहळा पाहता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2016 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close