S M L

तुकाराम मुंढेंविरुद्धचा अविश्वास ठराव राज्य सरकाकडून निलंबित

Samruddha Bhambure | Updated On: Nov 2, 2016 10:15 PM IST

tukaram_mundhe

02 नोव्हेंबर - नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव राज्य सरकारने निलंबित केलाय. यासोबतच सरकारनं तुकाराम मुंढेंना आपली बाजू मांडण्यासाठी 30 दिवसांचा कालावधीही दिलाय. त्यामुळे मुंढे तूर्तास तरी नवी मुंबईच्या आयुक्तपदी राहणार, असं स्पष्ट झालंय.

बेकायदा बांधकामांवरच्या धडाकेबाज कारवाईमुळे तुकाराम मुंढे सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये अगदी कमी वेळात लोकप्रिय झाले. पण त्यांची याच कामगिरीमुळे त्यांनी नगरसेवकांची नाराजी ओढवून घेतली होती. गेल्या आठवड्यात मुंढेंच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरेसवकांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मतदान केलं होतं. तर भाजपच्या नगरसेवकांनी तुकाराम मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात होता.

आज राज्य सरकारनं नवी मुंबई महापालिकेचा अविश्‍वास ठराव निलंबित केला. सरकारनं हा निर्णय घेऊन आयुक्त तुकाराम मुंढेंना अभय दिलंय. येत्या 30 दिवसांच्या काळात आयुक्त मुंढे आपली बाजू कशी मांडतात, त्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार यावर सगळं काही अवलंबून आहे. पण यामुळे नवी मुंबई महापालिका विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2016 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close