S M L

आता दर सोमवारी गुरूजी म्हणणार 'चल बेटा सेल्फी ले ले रे'!

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2016 01:16 PM IST

आता दर सोमवारी गुरूजी म्हणणार 'चल बेटा सेल्फी ले ले रे'!

04 नोव्हेंबर :  विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्यच असतात. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागाने आणखी एक नवी शक्कल लढविली आहे. यापुढे  दर सोमवारी शाळेतील मुलांसोबत सेल्फी घेऊन हे फोटो ‘सरल’मध्ये अपलोड करण्याचं नवं काम गुरुजी मंडळींना करावं लागणार आहे. या योजनेतून मुलांची शाळेतील गैरहजेरी कमी होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सोडण्यात आले आहेत. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने तत्परतेने जीआर काढून कारवाई सुरू केलीय.

महिन्याच्या पहिल्या दोन सोमवारी शिक्षकांनी शाळेतील  प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून सरल या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढील सोमवारी शाळेस वरचेवर गैरहजर राहणाऱ्या मुलांचे सेल्फी घ्यायचे आहेत. या मुलांचे फोटो त्यांच्या आधार नंबरसह ‘सरल’मध्ये अपलोड करावे लागणार आहेत. असे केल्याने फक्त गैरहजर राहणाऱ्या मुलांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे शिक्षण राहिलं दूर पण शिक्षकांना सेल्फी काढण्यातच वेळ घालवावा लागेल असं दिसतंय.

सोमवार सेल्फी डे..

- जानेवारी 2017 पासून शाळेच्या पटावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 10 च्या गटांत शिक्षकांसोबत सेल्फी घेण्यात यावे

- हे सेल्फी मुलांच्या नावासह आणि आधारक्रमांकासह 'सरल'मध्ये अपलोड करावेत

- सुरुवातीच्या 2 सोमवारांनंतर अनियमित असलेल्या विद्यार्थ्यांचे सेल्फी आणि आधार क्रमांक अपलोड करावे. याद्वारे अनियमित मुलांसाठी काम करणं सोपं जाईल, सेल्फी अपलोड करायचा वेळ वाचेल

- पटावर नावाच्या तुलनेत हजर असलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या सुरुवातीचे 2 आठवडे शासनास सादर करणं बंधनकारक

- शिक्षणाधिकार्‍यांना तालुकानिहाय गैरहजर विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती द्यावी

- गटशिक्षणाधिकार्‍यांना शाळानिहाय गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची नावे द्यावी

- याद्वारे अनियमित विद्यार्थ्यांना नियमित करण्याचे गूढ शिक्षक आणि क्षेत्रिय अधिकार्‍यांना कळेल

'सेल्फी'पेक्षा 'सेफ्टी' महत्त्वाची ! ( 2015 ते 2016 मधील सेल्फीचे बळी)

- जानेवारी 2016 - जम्मू-काश्मीर - किल्ल्यावर सेल्फी काढताना 20 वर्षांच्या तरुणाचा 60 फूट खाली पडून मृत्यू

- फेब्रुवारी 2016 - चेन्नई - 16 वर्षांच्या मुलाचा धावत्या ट्रेनसमोर उभं राहून सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यू

- फेब्रुवारी 2016 - नाशिक - वालदेवी परिसरात सेल्फी काढताना तलावात पडून एकाचा मृत्यू

- जून 2016 - लोणावळा - सेल्फी काढण्याचा नादात अमृतांजन पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू

- जुलै 2016 - खंडाळा - सेल्फी काढण्यासाठी डोंगरावर चढलेल्या 36 वर्षांच्या व्यक्तीचा 200 फूट दरीत पडून मृत्यू

- जुलै 2016 - सिंधुदुर्गातील आंबोली घाटात टेकडीवरून सेल्फी काढण्याच्या नादात एकाचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close