S M L

... पण आजीबाईच्या बटव्याचं काय?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2016 01:51 PM IST

... पण आजीबाईच्या बटव्याचं काय?

 

11 नोव्हेंबर :  पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा नव्या करण्यासाठी किंवा हजार रूपयाच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी, तसंच दोन हजार रूपयांची नवी नोट मिळवण्यासाठी सध्या सगळीकडे झुंबड उडालीय. ज्यांचे बँकेत अकाऊंट आहे किंवा जे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकतात त्यांच्यासाठी सरकारनं केलेल्या सोयी ठिक आहेत. पण तुम्हाला आठवतं का की तुमच्या लहानपणी किंवा आताही घरात लग्नसराईला, एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला पैसा कमी पडला तर कोण मदतीला येतं? अर्थातच घरातली आजी, आजोबा. त्यातल्या त्यात आजीचे पैसे काही बँकेत नसतात. ते तिनं कुण्या शेजार्‍याकडं, एखाद्या जवळच्या बाईकडं किंवा घरात कुठं तरी उतरंडीला ठेवलेले असतात. लेकराबाळांचं घर संकटात सापडलंय असं दिसलं की आजीबाईचा बटवा मोकळा होतो आणि घर पुन्हा सावरतं. नातीच्या लग्नासाठी, नातवाच्या बारशासाठीही आजी हळूच पैसा बाहेर काढते. हा पैसा काही थोडा थोडका नसतो.

त्या आजीबाईकडं आताही असेच पाचशे हजारच्या बर्‍यापैकी नोटा आहेत आणि त्या बँकेपर्यंत पोहोचण्याची किंवा बँक त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता दूर दूर पर्यंत नाही. मग आजीबाईचा हा ठेवा सुरक्षित करण्यासाठी सरकार काय करणार आहे? आजही सरकारच्या जनधन योजनेनंतरही देशात फक्त एक तृतीयांश लोकांकडेच बँकेचं किंवा पोस्टात खातं आहे. म्हणजे 20 ते 25 टक्क्यांच्या आसपास. त्यात महिलांची खाती जवळपास नसल्यात जमा आहेत. असतील तर ते नवर्‍यापासून, स्वत:च्या मुलापासून लपवून ठेवलेले आहेत. लपवण्याचा उद्देश एवढाच की घराच्या संकटकाळी ते वापरता येतील. आता तो सगळ्या इमानइतबारे कमावलेला, पै पै करून जमवलेला ठेवा सरकारच्या नोटबदलीनं संकटात आल्याचं चित्रं आहे. बरं एखाद्या वेळेस बँकेत जाऊन नोटा बदलून मिळतीलही पण पोराबाळांपासून तो सुरक्षित कसा रहाणार? सरकारनं याचाही विचार करणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close