S M L

हुसेन आपल्याला कळला का ?

कमलेश देवरुखकर, मुंबई 09 जूनकोट्यवधी लोकांना परिचित असलेला, कोट्यवधी लोकांचा रोष ओढवून घेतलेला, कोट्यवधींच्या किमतीत, चित्र विकला जाणारा पण हाताच्या बोटावर मोजता येतील अशा अवघ्या काही जणांना कळलेला एम एफ हुसेन आज गेला. जाताना जगाच्या कलाक्षेत्रावर भारतीय चित्रकारितेचा एक अढळ तारा ठेवून गेला.हुसेन,मकबूल फिदा हुसेन किंवा फक्त एम.एफ या तिघांपैकी कुठलंही नाव घेतलं तरीही डोळ्यासमोर येतो एकच अवलिया. ज्याच्यात ठासून भरला होता चित्रकार म्हणून असलेला एक विक्षिप्तपणा, विलक्षणपणा, कलंदरपणा. पंढरपूरवरून तो मुंबईत आला. जेजे ते जहांगिर आणि भूलाभाई देसाई रोडवरचा परिसर चित्रांसाठी तुडवत राहिला. चित्रकलेसाठी कुठल्याही स्कूलचं बिरुद न लावता स्वतःचं एक स्कूल निर्माण करता झाला. चित्र अवघ्या काहीशे रुपयात विकली जाण्याचा तो काळ होता. पन्नासचं दशक. चित्रकार होणं म्हणजे भिकेचे डोहाळे लागणे असं म्हटलं जाणारा तो काळ. त्या काळात त्याने चित्रकला जोपासली. पोटासाठी नव्हे तर हृदयासाठी. एकेका रंगासाठी पैसे साठवून साठवून चित्र रंगवली. आणि नुसती रंगवली नाहीत तर भारतीय चित्रकलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी मानमरातब मिळवून दिला अशा दिग्गजांपैकी तो एक झाला. कदाचित सर्वात आघाडीवरचा.त्याच्या चित्रांमधील बोल्ड स्ट्रोक्सची चर्चा झाली नाही. वयाच्या नव्वदीतही तो चित्र कसा काढायचा याची चर्चा झाली नाही. तो कॅनव्हासवर चित्र काढण्याआधी गणपती काढायचा याची चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती त्यानं रंगवलेल्या नग्न चित्रांची. तो चप्पल घालत नाही याची, त्याच्या सफेद शुभ्र दाढीची, लोकांनी त्याला स्टंटबाज ठरवला. आणि मग धार्मिकतेच्या जंजाळात अडकलेली कुठलीही गोष्ट रद्दबातल ठरते तशी त्याची संपूर्ण चित्रकलाच रद्दबातल ठरवली गेली. हुसेन आणि नग्न चित्र एवढ्‌यापुरतंच त्याला मर्यादित केलं गेलं. निदान भारतात तरी. हुसेन आपल्याला कळला का? माणूस म्हणून कळणं तर दूर. एक चित्रकार म्हणून तरी तो आपल्याला कळला का? असे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कारण तो आपल्याला कळलाच नाही म्हणून तर आपण त्याला भारताबाहेर हुसकावला. व्हॅन गॉघ नेदरलँडचा. पाब्लो पिकासो स्पेनचा, पण हुसेन आमच्या भारताचा असं आपण म्हणून शकलो का तर नाही. त्याच्या मृत्यूपश्चात म्हणण्यात अर्थ नाही. त्याच्या जिवंतपणी आपण हे जगाला ठणकावून म्हणू शकलो नाही हे आपलं सर्वात मोठं दुदैर्व आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 05:37 PM IST

हुसेन आपल्याला कळला का ?

कमलेश देवरुखकर, मुंबई

09 जून

कोट्यवधी लोकांना परिचित असलेला, कोट्यवधी लोकांचा रोष ओढवून घेतलेला, कोट्यवधींच्या किमतीत, चित्र विकला जाणारा पण हाताच्या बोटावर मोजता येतील अशा अवघ्या काही जणांना कळलेला एम एफ हुसेन आज गेला. जाताना जगाच्या कलाक्षेत्रावर भारतीय चित्रकारितेचा एक अढळ तारा ठेवून गेला.

हुसेन,मकबूल फिदा हुसेन किंवा फक्त एम.एफ या तिघांपैकी कुठलंही नाव घेतलं तरीही डोळ्यासमोर येतो एकच अवलिया. ज्याच्यात ठासून भरला होता चित्रकार म्हणून असलेला एक विक्षिप्तपणा, विलक्षणपणा, कलंदरपणा. पंढरपूरवरून तो मुंबईत आला. जेजे ते जहांगिर आणि भूलाभाई देसाई रोडवरचा परिसर चित्रांसाठी तुडवत राहिला. चित्रकलेसाठी कुठल्याही स्कूलचं बिरुद न लावता स्वतःचं एक स्कूल निर्माण करता झाला.

चित्र अवघ्या काहीशे रुपयात विकली जाण्याचा तो काळ होता. पन्नासचं दशक. चित्रकार होणं म्हणजे भिकेचे डोहाळे लागणे असं म्हटलं जाणारा तो काळ. त्या काळात त्याने चित्रकला जोपासली. पोटासाठी नव्हे तर हृदयासाठी. एकेका रंगासाठी पैसे साठवून साठवून चित्र रंगवली. आणि नुसती रंगवली नाहीत तर भारतीय चित्रकलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी मानमरातब मिळवून दिला अशा दिग्गजांपैकी तो एक झाला. कदाचित सर्वात आघाडीवरचा.

त्याच्या चित्रांमधील बोल्ड स्ट्रोक्सची चर्चा झाली नाही. वयाच्या नव्वदीतही तो चित्र कसा काढायचा याची चर्चा झाली नाही. तो कॅनव्हासवर चित्र काढण्याआधी गणपती काढायचा याची चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती त्यानं रंगवलेल्या नग्न चित्रांची.

तो चप्पल घालत नाही याची, त्याच्या सफेद शुभ्र दाढीची, लोकांनी त्याला स्टंटबाज ठरवला. आणि मग धार्मिकतेच्या जंजाळात अडकलेली कुठलीही गोष्ट रद्दबातल ठरते तशी त्याची संपूर्ण चित्रकलाच रद्दबातल ठरवली गेली. हुसेन आणि नग्न चित्र एवढ्‌यापुरतंच त्याला मर्यादित केलं गेलं. निदान भारतात तरी.

हुसेन आपल्याला कळला का? माणूस म्हणून कळणं तर दूर. एक चित्रकार म्हणून तरी तो आपल्याला कळला का? असे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कारण तो आपल्याला कळलाच नाही म्हणून तर आपण त्याला भारताबाहेर हुसकावला.

व्हॅन गॉघ नेदरलँडचा. पाब्लो पिकासो स्पेनचा, पण हुसेन आमच्या भारताचा असं आपण म्हणून शकलो का तर नाही. त्याच्या मृत्यूपश्चात म्हणण्यात अर्थ नाही. त्याच्या जिवंतपणी आपण हे जगाला ठणकावून म्हणू शकलो नाही हे आपलं सर्वात मोठं दुदैर्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close