S M L
  • 'कोयने'च्या दिव्याखाली अंधार !

    Published On: May 16, 2012 06:03 PM IST | Updated On: May 16, 2012 06:03 PM IST

    16 मेकोयना वीजप्रकल्पाला आज 50 वर्षं पूर्ण झाली आहे. राज्यातल्या इतिहासातला हा सर्वात मोठा विद्युतप्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र उजळून निघाला पण कोयनेतले धरणग्रस्त मात्र अजूनही उपेक्षेचा अंधार सोसत आहे.कोयनेत साधारण महिनाभरापूर्वी दुसरं लेक टॅपिंग यशस्वी झालं. महाराष्ट्राची विजेची भूक भागवण्यासाठी लेक टॅपिंगचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. ज्या जलविद्युत प्रकल्पासाठी हे लेक टॅपिंग केलं गेलं त्या कोयना हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे. अंधार्‍या महाराष्ट्राला प्रकाशाची स्वप्न दाखवणार्‍या या प्रकल्पाची पायाभरणी 1957 मध्ये यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, धनंजय गाडगीळ, यासारख्या द्रष्ट्‌या नेत्यांनी केली. आणि तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजे 16 मे 1967 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आणि राज्याला कमी खर्चात प्रदुषणमुक्त वीज मिळू लागली. प्रकाशाच्या वाटा- पहिल्या टप्प्यातून 260 मेगावॅट विजनिर्मिती- दुसर्‍या टप्प्यात 300 मेगावॅट विजनिर्मिती- तिसर्‍या टप्प्यात 320 मेगावॅट विजनिर्मिती- चौथ्या टप्प्यात 1080 मेगावॅट विजनिर्मिती- एकूण 1,960 मेगावॅट विजनिर्मिती होतेय राज्याच्या प्रगतीमध्ये या विद्युत प्रकल्पाचं मोठं योगदान आहे. आपल्या घरात जो दिवा लागतो, जो फॅन, कूलर, एसी, घरातली वॉशिंग मशीन, मायक्रोव्हेव्ह, शेतीतला पंप, कारख्यान्यातली मोठमोठी यंत्रं चालतात. त्यामागे राबणारे हजारो हात... अहोरात्र झटणारे कामगार... कोयनेची 5 दशकांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास आहे. पण...कोयनेच्या जलविद्युत प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशमान जरुर झाला असेल, पण यामुळे विस्थापित झालेल्यांच्या आयुष्यातला अंधार काही दूर झाला नाही. त्यांच्या निवार्‍यासाठी अजून छतही मिळालं नाही. या प्रकल्पाने 109 गावातल्या दहा हजार कुटुंबांना विस्थापित केलं गेलं. पण त्यावेळी पुनर्वसन कायदाच नसल्यानं त्यांचं पुनर्वसन झालंच नाही. 1988 पासून करत असलेल्या सततच्या लढ्यामुळे अखेर पुनर्वसन कायदा लागू झाला. अनेकांचं सातारा, सांगली, रायगड, ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आलं. पण ते ही अत्यंत संथ गतीनं झालं. ज्यांचं पुनर्वसन झालं त्यातही अनेक त्रुटी होत्या. अनेकांना अनधिकृत वसाहतींमध्ये घरं देण्यात आली. त्यात अनेक असुविधा होत्या. इतकंच नाही तर दीड हजार कुटुंब अजूनही उघड्यावर आहेत. याच धरणग्रस्तांनी प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नदीपात्रात मरणोत्सव आंदोलन केलं. ह्या विद्युत प्रकल्पाच्या आगीत ज्यांच्या संसारांची होळी झाली त्यांचा एकच प्रश्न आहे दिव्याखालचा हा अंधार कधी दूर होणार..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close