S M L
  • भारतीय खेळाडूंचे मिशन ऑलिम्पिक फत्ते

    Published On: Aug 13, 2012 04:31 PM IST | Updated On: Aug 13, 2012 04:31 PM IST

    13 ऑगस्टलंडन ऑलिम्पिक भारतासाठी खास ठरलंय. भारताचे 81 खेळाडू 13 क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते आणि यातल्या सहा खेळाडूंनी मेडल पटकावली आहेत. भारताच्या या यशाला सोनेरी झळाळी नसली तरी बीजिंगपेक्षा मेडलची संख्या दुप्पट झाली. यंदा भारतानं 2 सिल्व्हर आणि 4 ब्राँझ मेडल पटकावली. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हे चित्र नक्कीच आशादायी ठरलंय. भारतानं केली 6 मेडल्सची कमाई, 2 सिल्व्हर आणि 4 ब्राँझ मेडल, गगन नारंग, 10 मी. एअर रायफल, ब्राँझ मेडल.. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल्सच्या सर्वाधिक आशा होत्या त्या नेमबाजीतून...आणि नेमबाजांनीही भारतीय क्रीडाप्रेमींना निराश केलं नाही. ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडलचं खातं उघडून दिलं ते नेमबाजांनीच. 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगन नारंगनं ब्राँझ मेडलची कमाई केली. खरंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गोल्ड पटकावणार्‍या अभिनव बिंद्राच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष होतं. त्याचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आलं. पण गगन नारंगनं दमदार कामगिरी करत भारताचं आव्हान कायम राखलं. गगन नारंगनं 701.1 पॉईंटची कमाई करत भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं. जागतिक पातळीवरील सर्व मेडल्स गगननं जिंकली होती. जग जिंकणार्‍या गगनला फक्त आणि फक्त ऑलिम्पिक मेडलनं हुलकावणी दिली होती. पण अखेर ऑलिम्पिक मेडललाही गवसणी घालत गगननं हे स्वप्नही पूर्ण केलं. विजय कुमार, 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल, सिल्व्हर मेडल गगन नारंगच्या या कामगिरीला जोड मिळाली ती आणखी एका नेमबाजाची. भारतीय लष्करात असलेल्या विजय कुमारनं अचुक नेम साधत भारताला पहिलं सिल्व्हर मेडल मिळवून दिलं. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात विजय कुमारचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. विजय कुमारसाठी आंतरराष्ट्रीय पाळीवर स्वताला सिध्द करणं तसं नवं नाही. 5 कॉमनवेल्थ गोल्ड आमि 2 सलग एशियाड मेडल्स त्यानं जिंकलीत आणि ते ही फक्त 6 वर्षांत आणि आता त्याच्या खात्यात ऑलिम्पिक मेडलही जमा झालंय. सायना नेहवाल, बॅडमिंटन महिला एकेरी, ब्राँझ मेडलसायना नेहवाल...भारताची सर्वात यशस्वी महिला खेळाडू... ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं ब्राँझ मेडल म्हणजे आधीच गच्च भरलेल्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला गेलाय. जागतिक क्रमवारीत ती सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. सायना जरी लहान असली तरी तिच्या वया पेक्षा मोठी कामगिरी तिनं करून दाखवली. बॅडमिंटनमध्ये चीनची मक्तेदारी मोडत सायनानं भारताला मानाचं स्थान मिळवून दिलंय. एम सी मेरीकोम, महिला बॉक्सिंग, 51 किलो गट, ब्राँझ मेडलतब्बल पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा पराक्रम करणारी मेरी कोम ही जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे. यावर्षी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला. आणि या पहिल्याच स्पर्धेत मेरी कोमनं थेट मेडलला गवसणी घातली. 48 किलो गटात खेळणार्‍या मेरी कोमला ऑलिम्पिकमध्ये 51 किलो गटात खेळावं लागलं. पण मेरी कोम डगमगली नाही. पोलंड आणि ट्युनिशियाच्या बॉक्सर्सना नॉकआऊट पंच देत तीनं सेमीफायनलपर्यंत मजल मारली. योगेश्वर दत्त, कुस्ती 60 किलो गट, ब्राँझ मेडलऑलिम्पिकमध्ये मेडलची परंपरा कायम राखली ती पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूंनी... 60 किलो वजनी गटात योगेश्वर दत्तनं मेडलची कमाई केली, ऑलिम्पिक इतिहासात भारतानं कुस्तीत पटकावलेलं हे तिसरं मेडल ठरलं. रेपिचाज राऊंडमध्ये सलग तीन विजय मिळवत योगेश्वरनं ऐतिहासीक कामगिरी केली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरला समाधानकाराक कामगिरी करता आली नव्हती. पण ही उणीव त्यानं लंडन ऑलिम्पिकमध्ये भरुन काढली. कुस्तीत ब्राँझ मेडल पटकावत त्यानं खाशाबा जाधव आणि सुशील कुमारच्या पंक्तित बसण्याचा मान पटकावला. सुशीलकुमार, कुस्ती 66 किलो गट, सिल्व्हर मेडलभारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचा शेवटही तितकाच दमदार झाला. 66 किलो वजनी गटात कुस्तीपटू सुशील कुमारनं सिल्व्हर मेडल पटकावलं, करोडो भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. सुशील कुमारला सिल्व्हर मेडलवर मानावं लागलं असलं तरी त्याची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच ठरलीय. सलग ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तब्बल 56 वर्षांननंतर सुशील कुमारनं भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलं होतं. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये एक पाऊल पुढे टाकत सुशीलनं सिल्व्हर मेडलची कमाई केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लॅग बेअररचा मान मिळवणार्‍या सुशीलनं मेडल पटाकवत आपली जबाबदारी चोख बजावली. भारताच्या या मेडल विजेत्या खेळाडूंना आयबीएन-लोकमताच सलाम.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close