S M L
  • जमावाच्या क्रोधाचा बळी

    Published On: Oct 10, 2012 02:34 PM IST | Updated On: Oct 10, 2012 02:34 PM IST

    10 ऑक्टोबरएखाद्या व्यक्तीला भरवस्तीत दगडांनी ठेचून मारण्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा नागपुरात घडलाय. मुलींची छेड काढणार्‍या एका गुंडाला काल रात्री जमावने जीवे मारलं. पोलीस या गुंडावर कारवाई करत नसल्यामुळे लोकांना हे पाऊल उचलावं लागलं असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पण आज त्याच भागात अजून एक मृतदेह सापडल्याने या घटनेला नवं वळण मिळालंय. हा आक्रमक जमाव आहे नागपुरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतला.. इथे मुलींची छेड काढणार्‍या इक्बाल शेख या गुंडाला जमावाने मंगळवारी रात्री ठेचून मारलं. इक्बालचा भाऊ अक्रम जमावाच्या तावडीतून सुटला. त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अक्रमला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत सुमारे चारशेंच्या जमावाने सीताबर्डी पोलीस स्टेशनला घेराव घातला.इक्बाल आणि अक्रम अमली पदार्थांची विक्री करायचे.. आणि दहशत पसरवून मुलींची छेड काढायचे. तसंच हे दोघे तरुणांना जबरदस्तीनं अवैध धंद्यात ओढायचे. पण पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करत नव्हते, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या गुडांचं पोलिसांशी साटंलोटं असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.पण बुधवारी..याच भागात अजून एक मृतदेह सापडल्याने पोलिसांच्या तपासाला नाट्यमय वळण लागलं. इक्बाल आणि अक्रम यांनी मिळून या एका इसमाला पंधरा दिवसांपूर्वी ठार करून पुरलं. त्याचा मृतदेह काढून न्यावा, ही लोकांची मागणी या गुंडांनी फेटाळल्यानंतर हाणामारी झाली. आणि त्यातूनच इक्बालचा खून झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close